

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत पुणे पीपल्स बँकेने वारकऱ्यांसाठी उपयुक्त साहित्याचे वितरण केले. बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या उपक्रमात वारकरी दिंड्यांना माईक सिस्टीम, भोंगे, तंबू, भांडी तसेच भजन साहित्य यांसारख्या आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
७५ वर्षांची समृद्ध बँकिंग परंपरा लाभलेल्या पुणे पीपल्स बँकेने गेल्या १५ ते १६ वर्षांपासून आषाढी वारीसाठी पुणे शहरात येणाऱ्या वारकरी दिंड्यांना विविध उपयुक्त साहित्याचे वाटप करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. या वर्षी ९ आणि १० जुलै रोजी सेवा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित वारकरी स्वागत व महाप्रसाद कार्यक्रमात बँकेचे संचालक, पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या हस्ते साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते यांनी सांगितले की, "बँकिंग सेवांसोबतच समाजाप्रती असलेली बांधिलकी जपणे ही पुणे पीपल्स बँकेची परंपरा आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात असून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून भविष्यातही असे उपक्रम सुरू राहतील."
ज्येष्ठ संचालक श्री. सुभाष नडे म्हणाले, "वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून आध्यात्मिक प्रगती आणि मनःशांतीचा मार्ग आहे. आम्हाला प्रत्यक्ष वारीत सहभागी होता येत नसले तरी वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, या उद्देशाने बँकेमार्फत आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात येते."
यावेळी बँकेचे अध्यक्ष श्री. श्रीधर गायकवाड यांनी सांगितले की, चालू वर्ष हे बँकेचे अमृत महोत्सवी वर्ष असून विविध लोकहिताचे उपक्रम राबवून ते साजरे करण्यात येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत बँकेने सुमारे ३६० कोटी रुपयांची विक्रमी व्यवसायवाढ नोंदवली असून बँकेचा एकूण व्यवसाय ३,०६३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
ते पुढे म्हणाले की, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत बँकिंग सेवा पोहोचविणे हा बँकेचा स्थापनेपासूनचा मूलभूत उद्देश राहिला आहे. समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांच्या सहकार्यामुळेच बँकेची सातत्याने प्रगती होत असून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणारे वारकरी श्री विठ्ठलाच्या चरणी बँकेच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुणे पीपल्स बँकेने आषाढी वारीच्या निमित्ताने राबविलेला हा उपक्रम केवळ साहित्य वितरणापुरता मर्यादित नसून, समाजसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा जपणारा आदर्श उपक्रम असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.