

या महत्त्वपूर्ण परिसंवादाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व विद्या सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. विद्याधर अनास्कर यांनी अत्यंत खुबीने केले. त्यांनी आपल्या कौशल्यपूर्ण शैलीने व्यासपीठावरील तज्ज्ञ आणि समोरील सहभागी मान्यवरांना आपले विचार मोकळेपणाने मांडण्याची उत्तम संधी उपलब्ध करून दिली. या चर्चासत्रात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक मा. श्री. सतिश मराठे, गोखले इन्स्टिट्यूटमधील रिझर्व्ह बँक चेअरपर्सन डॉ. श्री. रबी मिश्रा, एनकेजेएसबी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका सीए प्रणाली धारधर, कॉसमॉस बँकेचे माजी अध्यक्ष सीए मिलिंद काळे आणि पुणे पीपल्स बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते यांनी प्रामुख्याने सहभाग घेतला होता.
परिसंवादामध्ये नागरी सहकारी बँकांच्या 'काल, आज आणि उद्या' या सद्यस्थितीवर आणि भविष्यातील वाटचालीवर सखोल मंथन करण्यात आले. नागरी सहकारी बँकांची संख्या व त्यांचे घटलेले प्रमाण आणि त्याची कारणमीमांसा करतानाच, बँकांनी आजवर केलेली उल्लेखनीय प्रगती यावरही प्रकाश टाकण्यात आला. यासोबतच केंद्र व राज्य शासनाचे नागरी सहकारी बँकांबाबतचे धोरण, त्यातील तांत्रिक त्रुटी आणि बदललेल्या अपेक्षा यावर विस्तृत चर्चा झाली. बँकांचे विलीनीकरण आणि त्यामागची रिझर्व्ह बँकेची भूमिका, रेग्युलेटर म्हणून आरबीआयचे अधिकार, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, नागरी सहकारी बँकांच्या संचालक पदाचा कालावधी व त्यासाठी लागू केलेला 'कूलिंग पिरियड' यांसारख्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांनी प्रकाश टाकला. आधुनिक बँकिंगच्या गरजा ओळखून माहिती तंत्रज्ञानाचा वापर, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) चे वाढते महत्त्व, बँकांचे नेतृत्व, स्थानिक नेतृत्व, समाजाच्या बदलत्या अपेक्षा आणि बँकिंग कर्मचाऱ्यांची सुरक्षितता अशा अनेक विषयांवर या वेळी दिलखुलास गप्पा रंगल्या. या सर्वसमावेशक चर्चेमुळे उपस्थित मान्यवरांच्या बँकिंगच्या भविष्याविषयीच्या अनेक शंकांचे निरसन झाले.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून ज्येष्ठ बँकर डॉ. दिलीप देशमुख यांनी लिहिलेल्या 'Banking Updates for UCB's' या नव्या मार्गदर्शक पुस्तकाचे प्रकाशन व्यासपीठावरील सर्व तज्ज्ञांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष मा. सीए भाऊ भगवंत कड आणि पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. निलेश ढमढेरे यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर विशेष रूपाने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बँकेचे अध्यक्ष श्री. श्रीधर गायकवाड यांनी सर्व पाहुण्यांचे व उपस्थितांचे स्वागत केले. बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते यांनी या चर्चासत्राचे स्वरूप व उद्दिष्ट स्पष्ट करतानाच, पुणे पीपल्स बँकेच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली कारकिर्दीचा आढावा घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचे उपाध्यक्ष श्री. बिपीनकुमार शहा, संचालक सीए जनार्दन रणदिवे, सुभाष नडे, डॉ. रमेश सोनावणे, मिलिंद वाणी, विश्वनाथ जाधव, संजीव असवले, सौ. निशा करपे, स्वीकृत तज्ज्ञ संचालिका सौ. श्वेता ढमाळ, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य श्री. अरुण डहाके, श्री. राजेंद्र गांगर्डे, श्री. उदय जगताप आणि कौस्तुभ भेगडे आदींनी सक्रिय सहभाग घेऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी बँकेचे ज्येष्ठ संचालक श्री. बबनराव भेगडे व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. संजय घोडके यांनी सर्व उपस्थितांचे आणि वक्त्यांचे आभार मानले.