

सहकार बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि., पुणे यांना राष्ट्रीय स्तरावरील तीन प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. “Best Multistate Urban Cooperative Bank”, “Best Digital Bank of the Year” आणि “Best Mobile Banking Initiative” हे पुरस्कार बँकेने पटकावले असून, चालू वर्षात बँकेला मिळालेल्या पुरस्कारांची संख्या सहावर पोहोचली आहे.
NAFCUB आणि पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने लखनौ येथे आयोजित ‘ को-ऑप बँकिंग समिट, प्रशिक्षण व पुरस्कार परिषद २०२६’ मध्ये हा सन्मान प्रदान करण्यात आला. देशभरातील २०० हून अधिक नागरी सहकारी बँकांचे प्रतिनिधी, बँकिंग तज्ज्ञ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
सदर पुरस्कार बँकेचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड, उपाध्यक्ष बिपीनकुमार शहा, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष अॅड.सुभाष मोहिते, ज्येष्ठ संचालक सीए जनार्दन रणदिवे ,सुभाष नडे, मिलिंद वाणी, सुभाष गांधी, विश्वनाथ जाधव, निशा करपे, संजीव असवले, स्वीकृत संचालिका श्वेता ढमाळ, यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके आणि आयटी विभाग प्रमुख कैलास पवार यांनी पुरस्कार स्वीकारले.
यावेळी बोलताना अध्यक्ष श्रीधर गायकवाड यांनी सांगितले की, हे पुरस्कार बँकेच्या सभासद, ग्राहक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक परिश्रमाची पावती असून ग्राहकांचा विश्वास, पारदर्शक सेवा, सुरक्षित व्यवहार आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हीच बँकेच्या प्रगतीची खरी ताकद आहे.
पुणे पीपल्स बँकेने डिजिटल बँकिंग क्षेत्रातही उल्लेखनीय प्रगती केली असून UPI, UPI Lite, IMPS, मोबाइल बँकिंग अॅप, RuPay एटीएम कार्ड, कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड, QR कोड, NACH तसेच क्लाऊड-आधारित सुरक्षा प्रणाली यांसारख्या आधुनिक सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळेच बँकेला ‘Best Digital Bank of the Year’ आणि ‘Best Mobile Banking Initiative’ हे पुरस्कार प्राप्त झाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके यांनी ग्राहकांचा वाढता विश्वास, आर्थिक स्थैर्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि कर्मचाऱ्यांचा समर्पित सेवाभाव ही बँकेच्या यशामागील प्रमुख कारणे असल्याचे सांगितले. तर बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते यांनी राष्ट्रीय स्तरावर सातत्याने मिळणारे पुरस्कार हे बँकेच्या सक्षम नेतृत्वाचे, आर्थिक सामर्थ्याचे आणि उत्कृष्ट ग्राहक सेवेचे प्रतीक असल्याचे नमूद केले.
दरम्यान, समिटअंतर्गत आयोजित परिसंवादात डॉ. संजय घोडके यांनी “Digital Banking for All : Expanding Financial Inclusion and Opportunity” या विषयावर मार्गदर्शन करताना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आर्थिक समावेशन वाढविणे आणि प्रत्येक नागरिकापर्यंत आधुनिक बँकिंग सेवा पोहोचविणे हेच बँकेचे ध्येय असल्याचे सांगितले.