

नवी दिल्ली : सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या भारत टॅक्सी या सेवा प्लॅटफॉर्मला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या प्लॅटफॉर्मवर ८.२७ लाखांहून अधिक चालकांनी नोंदणी केली असून, त्यापैकी जवळपास निम्म्या नोंदणी दिल्ली-एनसीआर आणि गुजरात या दोन प्रदेशांत झाल्या आहेत. केंद्र सरकारने ४ ऑगस्ट रोजी लोकसभेत ही माहिती दिली.
दिल्ली-एनसीआर हे भारत टॅक्सीसाठी सर्वात मोठे केंद्र ठरले असून, येथे २.६१ लाख 'सारथी' चालकांची नोंदणी झाली आहे. त्यानंतर गुजरातमध्ये १.०४ लाख, तर महाराष्ट्रात ८४,३३२ चालक या प्लॅटफॉर्मशी जोडले गेले आहेत. याशिवाय उत्तर प्रदेश, राजस्थान आणि चंदीगड येथे मिळून ५२ हजारांहून अधिक चालकांनी नोंदणी केली आहे.
राज्यानुसार वाहनांच्या प्रकारातही लक्षणीय फरक दिसून येतो. दिल्ली-एनसीआरमध्ये १.३६ लाख कॅब चालक, सुमारे ८८ हजार बाईक टॅक्सी चालक आणि ३८ हजार ऑटो-रिक्षा चालक नोंदणीकृत आहेत. गुजरातमध्ये मात्र ऑटो-रिक्षा चालकांचे वर्चस्व असून, तेथे जवळपास ५० हजार ऑटो-रिक्षा चालक, ३२,१९२ कॅब चालक आणि २२,२०७ बाईक टॅक्सी चालक नोंदणीकृत आहेत. महाराष्ट्रात ५३ हजारांहून अधिक कॅब चालक भारत टॅक्सीशी जोडले गेले आहेत.
सहकार मंत्रालयाच्या माहितीनुसार, चालकांची उपलब्धता, आवश्यक वैधानिक मंजुऱ्या तसेच राज्य सरकारे आणि सहकारी संस्थांशी समन्वय साधून भारत टॅक्सीचा विस्तार टप्प्याटप्प्याने देशातील इतर शहरांमध्ये करण्यात येणार आहे. याशिवाय विमानतळ, रेल्वे स्थानके, मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांशी भागीदारी करून 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी' अधिक सक्षम करण्याचीही योजना आहे.
सरकारने स्पष्ट केले आहे की, विद्यमान खाजगी अॅप-आधारित टॅक्सी अॅग्रीगेटर्सची जागा घेणे हा भारत टॅक्सीचा उद्देश नसून, चालकांना सहकारी तत्त्वावर पर्यायी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि प्रवाशांना विश्वासार्ह सेवा देणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
भारत टॅक्सी हा प्लॅटफॉर्म सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (STCL) या बहुराज्यीय सहकारी संस्थेमार्फत चालवला जातो. या संस्थेला NCDC, IFFCO, अमूल (GCMMF), KRIBHCO, NAFED, NABARD, NDDB आणि NCEL या आठ प्रमुख राष्ट्रीय सहकारी संस्थांचा पाठिंबा आहे.
सहकार मंत्रालयाने लोकसभेत स्पष्ट केले की, भारत टॅक्सीच्या स्थापनेसाठी किंवा विस्तारासाठी केंद्र सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत, इक्विटी सहाय्य किंवा विशेष प्रोत्साहन देण्यात आलेले नाही. हा उपक्रम पूर्णपणे सहकारी तत्त्वावर राबविण्यात येत आहे