मुंबई, पुण्यात सुरू झाली 'भारत टॅक्सी'; पहिल्या १.५ किमी प्रवासासाठी फक्त ३१ रुपये

एकाच मोबाईल अँपवर कार, ऑटो आणि बाईक टॅक्सीची सुविधा; सहकारी संस्थेच्या माध्यमातून चालकांना मालकीचा हक्क आणि प्रवाशांना पारदर्शक, परवडणारी सेवा.
भारत टॅक्सी
भारत टॅक्सी
Published on

प्रवाशांना सुरक्षित, पारदर्शक आणि परवडणाऱ्या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेली 'भारत टॅक्सी' सेवा आता मुंबई आणि पुणे शहरात सुरू झाली आहे. या सेवेमुळे प्रवाशांना एकाच मोबाईल अँपद्वारे कार, ऑटो-रिक्षा आणि बाईक टॅक्सी अशा तिन्ही प्रकारच्या वाहनांची सुविधा मिळणार आहे.

'भारत टॅक्सी' सेवा केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालय आणि नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजन (NeGD) यांनी संयुक्तपणे विकसित केली असून, तिचे संचालन सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड या सहकारी संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. खासगी ॲग्रीगेटर कंपन्यांना पर्याय म्हणून ही सेवा सहकारी तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी ६०० टॅक्सी सेवेत दाखल करण्यात आल्या असून, गेल्या तीन महिन्यांपासून ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू होती, अशी माहिती मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सी मेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिली.

बहुभाषिक मोबाईल अँप

अँड्रॉइड आणि आयफोन वापरकर्ते 'भारत टॅक्सी' अँप प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात. हे अँप मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषांमध्ये उपलब्ध आहे.

चालकच असतील संस्थेचे मालक

या उपक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वाहनचालक हे केवळ कर्मचारी नसून सहकारी संस्थेचे सदस्य आणि मालक असतील. त्यामुळे चालकांना त्यांच्या उत्पन्नाचा अधिक योग्य लाभ मिळण्यास मदत होणार असून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळेल.

प्रवासाचे भाडे

'भारत टॅक्सी' सेवेअंतर्गत पहिल्या १.५ किलोमीटर प्रवासासाठी ३१ रुपये भाडे आकारले जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त किलोमीटरसाठी २१ रुपये दर लागू होईल. निश्चित आणि पारदर्शक दरामुळे प्रवाशांना अचानक वाढणाऱ्या भाड्यापासून दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

'भारत टॅक्सी'ची प्रमुख वैशिष्ट्ये

  • मुंबई आणि पुण्यात सेवेची सुरुवात

  • एकाच अँपवर कार, ऑटो आणि बाईक टॅक्सीची सुविधा

  • पहिल्या १.५ किमी प्रवासासाठी ३१ रुपये भाडे

  • त्यानंतर प्रति किमी २१ रुपये दर

  • चालकच सहकारी संस्थेचे सदस्य व मालक

  • मराठीसह चार भाषांमध्ये मोबाईल अँप उपलब्ध

  • प्रारंभी ६०० टॅक्सींचा ताफा सेवेत दाखल

Banco News
www.banco.news