आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया ९५.७२ वर उघडला होता. व्यवहारादरम्यान त्याने ९४.८९ हा दिवसातील उच्चांक गाठला आणि अखेरीस ९४.९३ वर स्थिरावला. यापूर्वी गुरुवारी रुपया ९५.७४ वर बंद झाला होता.
आरबीआयच्या धोरणात्मक घोषणांमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढल्याचे परकीय चलन बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले. देशाचा मजबूत परकीय चलन साठा बाह्य आर्थिक धक्क्यांना तोंड देण्यासाठी पुरेसा असल्याचा विश्वास आरबीआयने व्यक्त केला. सध्या भारताकडे सुमारे ६८२.३ अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा असून तो जवळपास ११ महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा असल्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पश्चिम आशियातील तणावामुळे वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती आणि पुरवठा साखळीतील अडथळे लक्षात घेऊन आरबीआयने सलग दुसऱ्यांदा रेपो दर ५.२५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. पतधोरण समितीने हा निर्णय एकमताने घेतला.
आरबीआयने रुपयाला पाठबळ देण्यासाठी व्यापक उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये नवीन १५, ३० आणि ४० वर्षांच्या सरकारी रोख्यांसाठी ‘फुली ॲक्सेसिबल रूट’चा विस्तार, एफपीआयवरील एकाग्रता मर्यादा हटवणे, FCNR(B) ठेवींना अतिरिक्त समर्थन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी ECB स्वॅप विंडो आणि निर्यात वसुलीचा कालावधी पुन्हा नऊ महिन्यांपर्यंत वाढवणे या उपायांचा समावेश आहे.
त्यांच्या मते, २०१३ नंतरचा हा सर्वात मोठा डॉलर-एकत्रीकरणाचा प्रयत्न मानला जात आहे. केंद्र सरकारने सरकारी रोख्यांमधील परकीय गुंतवणुकीवरील कर हटवण्याचा निर्णय घेतल्याने जागतिक बाँड फंडांसाठी मोठा अडथळा दूर झाला आहे.
तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या खाली राहिल्यास रुपया आणखी मजबूत होऊ शकतो, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. नजीकच्या काळात रुपया ९४ ते ९४.५ या पातळीपर्यंत मजबूत होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले.
जागतिक बाजारात डॉलर निर्देशांक ०.१९ टक्क्यांनी घसरून ९९.२२ वर व्यवहार करत होता, तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल ९४.७५ डॉलरवर होती.
देशांतर्गत शेअर बाजारात मात्र घसरण दिसून आली. सेन्सेक्स ११६.६७ अंकांनी घसरून ७४,२४३.३४ वर बंद झाला, तर निफ्टी ४९.८५ अंकांनी घसरून २३,३६६.७० वर स्थिरावला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुरुवारी ₹४,४४७.०६ कोटींच्या समभागांची विक्री केल्याची माहिती समोर आली.
दरम्यान, आरबीआयने चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाज ६.९ टक्क्यांवरून ६.६ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. तसेच, आर्थिक वर्ष २०२७ साठी किरकोळ महागाईचा अंदाज ४.६ टक्क्यांवरून वाढवून ५.१ टक्के करण्यात आला आहे.