आजचा भारत थांबणारा नाही. वंदे भारतसारख्या वेगवान ट्रेन, जगाला चकित करणारी UPI डिजिटल पेमेंट व्यवस्था, स्टार्टअप्सचा वाढता प्रभाव आणि जगभरात चमकणारी भारतीय प्रतिभा या सर्व गोष्टी भारताच्या वाढत्या आर्थिक ताकदीची साक्ष देत आहेत. त्यामुळेच आता एक मोठा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे भारत चीनला मागे टाकू शकतो का?
याच पार्श्वभूमीवर जागतिक आर्थिक क्षेत्रातून भारतासाठी मोठी आनंदवार्ता समोर आली आहे. पॅरिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (PSE) येथील वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅबच्या संशोधकांनी तयार केलेल्या अहवालानुसार, 2060 पर्यंत PPP अर्थात क्रयशक्ती समानतेच्या आधारावर भारताचा जागतिक GDP मधील वाटा चीनपेक्षाही अधिक होऊ शकतो.
अहवालानुसार, सध्या जागतिक GDP मध्ये चीनचा वाटा सुमारे 20 टक्के आहे, जो अमेरिकेपेक्षाही जास्त आहे. 2035 पर्यंत चीनची अर्थव्यवस्था अमेरिकेच्या जवळपास दुप्पट होण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी चीनसमोर एक मोठे संकट उभे राहत आहे घटती आणि वृद्ध होत चाललेली लोकसंख्या.
1945 मध्ये जगातील एकूण लोकसंख्येतील चीनचा वाटा जवळपास 23 टक्के होता. तो 2025 मध्ये 17 टक्क्यांवर आला असून 2100 पर्यंत तो 8 टक्क्यांपेक्षाही खाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परिणामी, चीनची स्वस्त मजूरशक्ती आणि उत्पादनक्षमता हळूहळू कमी होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
एकेकाळी चीनची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची प्रचंड लोकसंख्या आणि स्वस्त मजूर होते. पण आता त्याच लोकसंख्येचे वृद्धत्व चीनच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठे आव्हान बनत आहे. काम करणाऱ्या लोकांची संख्या घटल्यास उत्पादनक्षमता आणि आर्थिक वाढ दोन्ही मंदावण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे भारताकडे जगातील सर्वात मोठी तरुण लोकसंख्या आहे. भारतातील युवा वर्ग नवीन कौशल्ये आत्मसात करण्यास तयार असून तंत्रज्ञान, उद्योग आणि सेवा क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे 2050 नंतर भारताची आर्थिक झेप अधिक वेगाने वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अहवालात भारताचे कौतुक करण्यात आले असले तरी एक कटू वास्तवही अधोरेखित करण्यात आले आहे. चीनने गेल्या काही दशकांत शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली. त्यामुळे तेथील उत्पादकता झपाट्याने वाढली.
भारतामध्ये मात्र अजूनही श्रीमंत आणि गरीब यांच्यात मोठी दरी आहे. ग्रामीण भागातील शिक्षण, कौशल्य विकास आणि आरोग्य सेवा अनेक ठिकाणी अपुऱ्या आहेत. त्यामुळे भारताने खऱ्या अर्थाने आर्थिक महासत्ता बनायचे असेल तर प्रत्येक गावापर्यंत दर्जेदार शिक्षण, डिजिटल सुविधा आणि रोजगाराच्या संधी पोहोचवणे आवश्यक ठरणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, जर भारताने आपल्या युवा शक्तीचा योग्य वापर केला, शिक्षण आणि कौशल्य विकासावर भर दिला आणि आर्थिक विषमता कमी केली, तर 2060 पर्यंत भारत केवळ चीनलाच मागे टाकणार नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेचे नवे नेतृत्व करणारा देश ठरू शकतो.
आजचा भारत बदलतो आहे आणि जगही ते पाहत आहे. मात्र महासत्ता होण्याचा मार्ग केवळ मोठ्या GDP मधून नाही, तर प्रत्येक नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यातूनच तयार होणार आहे.