पॉलिमर नोटांच्या 'फिल्ड ट्रायल'ला रिझर्व्ह बँकेची मंजुरी.

कागदी नोटा बंद होणार की चालूच राहणार? जाणून घ्या अर्थमंत्र्यांनी संसदेत दिलेली संपूर्ण माहिती.
RBI plastic notes - Polymer banknotes India
नोटा बदलण्याची कसरत नाही! १० व २० च्या प्लास्टिक नोटांची चाचणी सुरू.
Published on

देशातील चलनाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून, लवकरच भारतीय नागरिकांच्या खिशात कागदी नोटांऐवजी टिकाऊ प्लास्टिक (पॉलिमर) नोटा पाहायला मिळणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) १० आणि २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा छापण्याबाबत ठेवलेला प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केला आहे. या ऐतिहासिक निर्णयांतर्गत प्राथमिक टप्प्यात १० आणि २० रुपयांच्या प्रत्येकी १००-१०० कोटी (एक अब्ज) पॉलिमर बँकनोट्सची फिल्ड ट्रायल घेतली जाणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही महत्त्वाची माहिती दिली. 'भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम, १९३४' च्या कलम २५ अंतर्गत केंद्रीय बोर्डाच्या शिफारशीनुसार ही मंजुरी देण्यात आली आहे.

कागदी नोटा बंद होणार का? सामान्य नागरिकांवर काय परिणाम?

नवीन प्लास्टिक नोटा बाजारात आल्या तरी जुन्या कागदी नोटा अचानक किंवा लगेचच चलनातून बाद केल्या जाणार नाहीत. या पॉलिमर नोटा सध्याच्या कागदी नोटांसोबतच नियमित व्यवहारात वापरल्या जातील. त्यामुळे नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत रांगा लावण्याची कोणतीही कसरत नागरिकांना करावी लागणार नाही. सध्या या नोटांच्या छपाईची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, प्रत्यक्ष बाजारात त्या कधी उपलब्ध होतील याची अधिकृत तारीख रिझर्व्ह बँक लवकरच जाहीर करेल.

RBI plastic notes - Polymer banknotes India
रिझर्व्ह बँकेकडून पॉलिमर नोटांची चाचणी सुरू, जाणून घ्या काय आहे योजना?

पॉलिमर नोटांची खास वैशिष्‍ट्ये : का आहेत या नोटा खास?

सामान्य प्लास्टिक आणि या नोटांमध्ये वापरण्यात येणाऱ्या पॉलिमरमध्ये खूप मोठा फरक असतो. या नोटांच्या निर्मितीसाठी 'बायॲक्सियली ओरिएंटेड पॉलिप्रॉपिलीन' (BOPP) या विशेष घटकाचा वापर केला जातो.

  • टिकाऊपणा: या नोटा कागदी नोटांपेक्षा सुमारे २.५ ते ४ पट अधिक काळ टिकतात. काही तज्ज्ञांच्या मते यांचे आयुष्य ६ पट अधिक असते.

  • पाणी आणि मळरोधक: या नोटा पाण्याने भिजत नाहीत, घामाने मळत नाहीत, तेल किंवा धुळीने खराब होत नाहीत आणि सहजासहजी फाटतही नाहीत.

  • बनावट नोटांना आळा: पॉलिमर शीट मिळवणे आणि त्यावर सुरक्षा वैशिष्ट्ये छापणे अत्यंत क्लिष्ट असल्याने या नोटांच्या बनावट (डुप्लिकेट) प्रती तयार करणे गुन्हेगारांसाठी जवळजवळ अशक्य आहे.

प्लास्टिक नोटांच्या निर्मितीसाठी साधारण कागदी नोटांपेक्षा ३०% ते ६०% अधिक खर्च येतो. या फिल्ड ट्रायलसाठी सुमारे तीन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

जरी सुरुवातीचा छपाई खर्च जास्त असला, तरी या नोटांचे आयुष्य खूप जास्त असल्याने वारंवार नवीन नोटा छापण्याचा रिझर्व्ह बँकेचा प्रचंड खर्च वाचणार आहे. गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेने ८,२७० कोटी नवीन कागदी नोटा बाजारात आणल्या होत्या, तर ६,२१३ कोटी जुन्या मळलेल्या व फाटलेल्या नोटा नष्ट केल्या होत्या. प्लास्टिक नोटांमुळे हा प्रचंड अपव्यय टळणार आहे.

RBI plastic notes - Polymer banknotes India
१० व २० रुपयांच्या नोटांचे रूप बदलणार?

प्लास्टिक चलनांचा वापर करणारा भारत हा पहिला देश नाही. सध्या जगातील जवळपास ६० देश पॉलिमर नोटांचा वापर करत आहेत.

  • ऑस्ट्रेलिया: १९८८ मध्ये जगात पहिल्यांदा १० डॉलरची प्लास्टिक नोट आणणारा देश.

  • इतर देश: सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, कॅनडा (२०११) आणि युरोपमधील रोमानिया (१९९८) या देशांमध्ये पॉलिमर नोटांचा यशस्वी वापर सुरू आहे.

आता भारतही या प्रगत देशांच्या रांगेत जाऊन बसणार असून, देशातील नाणे-नोटांच्या व्यवहारात हे एक क्रांतिकारक पाऊल ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Banco News
www.banco.news