१० व २० रुपयांच्या नोटांचे रूप बदलणार?

केंद्र सरकारकडून चाचणीला हिरवा कंदील; पण कागदी नोटा त्वरित बंद होणार नसल्याचे स्पष्टीकरण.
RBI field trial for polymer notes - RBI currency news
१०-२० रुपयांच्या नोटांचे नवे रूप: 'पॉलिमर' चाचणीला मंजुरी
Published on

देशातील लहान मूल्याच्या चलनी नोटांचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सादर केलेल्या १० आणि २० रुपयांच्या पॉलिमर (प्लास्टिक) नोटांच्या क्षेत्रीय चाचणीला (Field Trials) सरकारने औपचारिक मंजुरी दिली आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. मात्र, यामुळे सध्याचे कागदी चलन बंद होणार नसून, पॉलिमर नोटा या कागदी नोटांसोबतच व्यवहारात राहतील, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

१ अब्ज नोटांची होणार क्षेत्रीय चाचणी

रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाच्या शिफारशीनुसार, १० रुपये आणि २० रुपयांच्या प्रत्येकी १ अब्ज (१०० कोटी) पॉलिमर नोटा प्रायोगिक तत्त्वावर बाजारात आणल्या जातील. या क्षेत्रीय चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतरच या नोटांचे नियमित वितरण आणि उत्पादन सुरू केले जाईल. आंतरराष्ट्रीय अभ्यासांचा संदर्भ देत अर्थ राज्यमंत्र्यांनी सांगितले की, पॉलिमर नोटांचे आयुष्य हे पारंपरिक कागदी नोटांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त असते. त्यामुळे वारंवार होणारा नोटांच्या छपाईचा खर्च कमी होईल आणि नोटा दीर्घकाळ सुस्थितीत राहतील.

RBI field trial for polymer notes - RBI currency news
रिझर्व्ह बँकेकडून पॉलिमर नोटांची चाचणी सुरू, जाणून घ्या काय आहे योजना?

कागदी चलन बंद होणार नाही; डिजिटल व्यवहारांना पूरक

या चाचणीमुळे बाजारातील कागदी नोटा पूर्णपणे बंद होणार का, अशी शंका व्यक्त केली जात होती. त्यावर स्पष्टीकरण देताना सरकारने सांगितले की, कागदी चलन पूर्णपणे पॉलिमर नोटांनी बदलण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या विचाराधीन नाही.

तसेच, पॉलिमर नोटांमुळे डिजिटल पेमेंट प्रणालीवर काही परिणाम होईल का, यावर बोलताना चौधरी म्हणाले की, पॉलिमर नोटांची ही चाचणी अजून प्राथमिक टप्प्यात आहे. त्यामुळे डिजिटल व्यवहारांवर याचा काय परिणाम होतो, हे नियमित वितरण सुरू झाल्यानंतरच स्पष्ट होईल. रोख रक्कम (नोटा) आणि डिजिटल पेमेंट सिस्टीम या दोन्ही जनतेच्या सोयीसाठी एकमेकांना पूरक असणाऱ्या पद्धती आहेत.

यापूर्वी रिझर्व्ह बँकेने बनावट नोटांच्या (Fake Currency) समस्येवर मात करण्यासाठी आणि चलनाचा दर्जा सुधारण्यासाठी विविध तांत्रिक उपायांचा अवलंब केला होता. पॉलिमर नोटांचा वापर आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांमध्ये यशस्वी ठरला आहे. कागदी नोटांच्या तुलनेत पॉलिमर नोटा फाटणे, ओल्या होणे किंवा लवकर खराब होणे या समस्यांपासून मुक्त असतात. याशिवाय, पॉलिमर नोटांमध्ये अत्याधुनिक सुरक्षानिर्देशकांचा (Security Features) समावेश करणे सहज शक्य होत असल्याने बनावट नोटा बनवणे अत्यंत कठीण जाते. याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने भारतातही पॉलिमर नोटांच्या वापरासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

सध्या १० आणि २० रुपयांच्या नोटांचा दैनंदिन व्यवहारात मोठ्या प्रमाणावर वापर होतो, ज्यामुळे त्या लवकर मळतात किंवा फाटतात. पॉलिमर नोटांच्या चाचणीमुळे भारतीय चलनाची ही समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यास येत्या काळात नागरिकांच्या हातात अधिक स्वच्छ आणि टिकाऊ चलन पाहायला मिळेल.

Banco News
www.banco.news