'मायथोस'चे संकट आणि भारतीय बँकिंग समोरिल सुरक्षेचे आव्हान

एका रहस्यमय एआय मॉडेलमुळे देशाच्या वित्तीय सुरक्षेला धोका; अर्थमंत्रालयाचा बँकांना हाय-अलर्ट!
Mythos AI - Indian banking cyber threat
एआयच्या नव्या वादळाचा सामना करण्यासाठी भारतीय बँकांना बदलावी लागणार सुरक्षा कवच!
Published on

मुंबई: तंत्रज्ञानाचा वेगाने होणारा विकास जितका मानवी जीवनाला सुकर करत आहे, तितकीच नवीन आव्हानेही समोर आणत आहे. याचेच सर्वात ताजे आणि चिंताजनक उदाहरण म्हणजे अमेरिकी कंपनी 'अँथ्रोपिक'चे 'मायथोस' (Mythos) हे प्रगत कृत्रिम प्रज्ञा (AI) मॉडेल. हे मॉडेल जर सार्वजनिक झाले, तर देशाच्या आणि पर्यायाने जगाच्या बँकिंग क्षेत्रासमोर सुरक्षेचे मोठे संकट उभे ठाकणार आहे. याच पार्श्वभूमीवर, केंद्रीय अर्थमंत्रालयातील वित्तीय सेवा सचिव एम. नागराजू यांनी भारतीय बँकांना आपली सायबर सुरक्षा कवच अधिक मजबूत करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

हा केवळ एक तांत्रिक इशारा नसून, भारताचा आर्थिक कणा असलेल्या बँकिंग व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे.

अँथ्रोपिक (Anthropic) या आघाडीच्या अमेरिकन एआय कंपनीने विकसित केलेले 'मायथोस' हे अत्यंत शक्तिशाली एआय मॉडेल आहे. सध्या हे मॉडेल मर्यादित स्वरूपात असले, तरी ते जेव्हा सार्वजनिकरित्या उपलब्ध होईल, तेव्हा त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. अँथ्रोपिक 'पब्लिक फोकस' मध्ये आली ती अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच्या वादामुळे. अँथ्रोपिकने आपले तंत्रज्ञान अमेरिकन लष्करासाठी वापरात आणताना काही निर्बंध लादल्यामुळे. या निर्बंधांमुळे ट्रम्प प्रशासनाने अँथ्रोपिकला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकले होते.

  • यंत्रणेतील त्रुटींचा तात्काळ शोध: 'मायथोस'मध्ये अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या डिजिटल प्रणालीतील त्रुटी (Vulnerabilities) काही सेकंदांत शोधण्याची अफाट क्षमता आहे.

  • हॅकर्सचे नवे अस्त्र: हे तंत्रज्ञान जर चुकीच्या किंवा अनिष्ट प्रवृत्तींच्या हाती गेले, तर बँकांच्या क्लिष्ट आय टी सिस्टीममधील कमकुवत दुवे (loopholes) शोधून त्यावर 'सायबर' हल्ला करणे अत्यंत सोपे होईल.

  • वेग आणि अचूकता: मानवी 'हॅकर्स'ना ज्या त्रुटी शोधायला महिने लागतात, त्या त्रुटी 'मायथोस' सारखी एआय मॉडेल्स तात्काळ शोधून काढू शकतात. यामुळे सायबर हल्ल्यांची गती आणि तीव्रता कैक पटीने वाढेल.

Mythos AI - Indian banking cyber threat
सावधान! तुमची बँक सुरक्षित आहे का ? अर्थमंत्र्यांनी दिला हाय-अलर्ट

'इंडियन बँक्स असोसिएशन' (IBA) तर्फे आयोजित जोखीम व्यवस्थापन परिषदेत बोलताना वित्तीय सेवा सचिव एम. नागराजू यांनी या धोक्याचे गांभीर्य अधोरेखित केले. त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

"मायथोस हे मॉडेल देशात सार्वजनिकरित्या वितरित झाल्यास भारतीय बँकिंग समुदाय त्याचा सामना करण्यासाठी सज्ज असायला हवे . जागतिक स्तरावरील वित्तीय नियामकांनी या धोक्याची दखल घेतली असून, बँकिंग तंत्रज्ञानातील कमकुवत बाजूंवर बोट ठेवले आहे."

नागराजू यांच्या मते, कोणत्याही वित्तीय संस्थेचे कामकाज अखंडित सुरक्षितपणे चालणे ही त्या संस्थांच्या आणि पर्यायाने देशाच्या आर्थिक स्थिरतेची पहिली पायरी असते. मात्र, आजची संपूर्ण वित्तीय व्यवस्था डिजिटल साखळीने एकमेकांशी जोडलेली आहे. त्यामुळे एका बँकेवर झालेला यशस्वी सायबर हल्ला संपूर्ण बाजाराला आणि व्यवस्थेला पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळवून टाकू शकतो.

भारतीय बँकांसमोरील आव्हाने आणि पुढील दिशा

भारतीय बँकिंग क्षेत्र सध्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या सुवर्णकाळातून जात आहे. युपीआय (UPI) पासून ते नेट बँकिंगपर्यंत आपण आघाडीवर आहोत. पण, याच डिजिटल क्रांतीमुळे आपली जोखीमही वाढली आहे. 'मायथोस'सारख्या संकटाचा सामना करण्यासाठी बँकांना खालील त्रिसूत्रीचा अवलंब करावा लागेल:

१. सायबर सुरक्षेचे 'प्रो-अ‍ॅक्टिव्ह' ऑडिट

बँकांनी केवळ हल्ला झाल्यावर उपाययोजना करण्यापेक्षा, स्वतःहून आपल्या यंत्रणेचे नियमित 'रेड-टीमिंग' (कृत्रिम सायबर हल्ले करून त्रुटी शोधणे) करणे गरजेचे आहे.

२. एआय विरुद्ध एआय (AI vs AI) संरक्षण

हॅकर्स जर एआयचा वापर करत असतील, तर बँकांनाही त्यांच्या बचावासाठी तितक्याच प्रगत 'डिफेंसिव्ह एआय' (Defensive AI) यंत्रणा वापराव्या लागतील, ज्या संशयास्पद हालचालींवर रिअल-टाइम लक्ष ठेवू शकतील.

३. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि जनजागृती

तांत्रिक उपायांसोबतच बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सोशल इंजिनिअरिंग आणि प्रगत फिशिंग हल्ल्यांबाबत सतत जागरूक ठेवणे आवश्यक आहे.

Mythos AI - Indian banking cyber threat
सहकारी बँका करणार सुरक्षेसाठी आयटीवर कोट्यवधींची उधळण!

'मायथोस'च्या निमित्ताने समोर आलेला हा धोका केवळ एका सॉफ्टवेअरपुरता मर्यादित नसून, तो एआय युगातील सायबर युद्धाची नांदी आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिलेला हा इशारा भारतीय बँकांसाठी एक 'वेक-अप कॉल' आहे. तंत्रज्ञान जितके प्रगत होत जाईल, तितकीच आपली सुरक्षा यंत्रणा अधिक अभेद्य करावी लागेल.

बँकांनी आता पारंपारिक सुरक्षा चौकटीबाहेर पडून, भविष्यातील या 'स्मार्ट' धोक्यांचा सामना करण्यासाठी आजच गुंतवणूक आणि तयारी करणे ही काळाची गरज बनली आहे. डिजिटल व्यवहार सुरक्षित राहतील, तरच देशाची वित्तीय स्थिरता अबाधित राहील.

Banco News
www.banco.news