गाण्यांसाठी एक 'क्लिक' अन् बँक खाते रिकामे!

देशभक्तीपर गाणी डाऊनलोड करण्याच्या घाईत घडला प्रकार; 'इव्हेंट-बेस्ड मालवेअर स्कॅम'चा नवा धोका समोर.
mumbai cyber fraud news
सण-उत्सवांच्या काळात सायबर चोरट्यांची नवी युक्ती; गाण्यांच्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी 'हे' नक्की वाचा.
Published on

मुंबई: राष्ट्रीय सणाचा उत्साह, सोसायटीतील कार्यक्रमाची तयारी आणि देशभक्तीपर गीतांची जोड... मात्र याच उत्साहाचा गैरफायदा घेत सायबर भामट्यांनी एका गृहिणीचे बँक खाते रिकामे केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील जोगेश्वरी परिसरात उघडकीस आली आहे. 'देशभक्तीपर गाणी एकाच ठिकाणी डाऊनलोड करा' या आमिषाला बळी पडल्याने एका ५६ वर्षीय गृहिणीला तब्बल ४४,५६० रुपयांचा फटका बसला आहे.

नक्की काय घडले?

आगामी राष्ट्रीय दिनानिमित्त जोगेश्वरीतील एका गृहनिर्माण संस्थेत देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी योग्य गाणी शोधून डाऊनलोड करण्याची जबाबदारी संबंधित गृहिणीवर होती. त्या गेल्या दोन दिवसांपासून इंटरनेटवर देशभक्तीपर गाणी शोधत होत्या. याच दरम्यान त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला, ज्यामध्ये "सर्व प्रसिद्ध देशभक्तीपर गाणी एकाच ठिकाणी डाऊनलोड करा" असा मजकूर आणि खाली एक अज्ञात 'लिंक' (Link) देण्यात आली होती.

mumbai cyber fraud news
डिजिटल लग्नपत्रिका... की बँक दरोडा? एक क्लिक ५ लाख गायब!

उत्सवाच्या घाईगडबडीत आणि गाणी शोधण्याच्या उत्साहात त्यांनी या लिंकची कोणतीही शहानिशा न करता त्यावर क्लिक केले. लिंकवर क्लिक करताच कोणतीही गाणी डाऊनलोड होण्याऐवजी काही सेकंदांतच मोबाईलची स्क्रीन काळी पडली आणि फोन आपोआप 'स्विच ऑफ' झाला.

अवघ्या काही मिनिटांत बँक खाते रिकामे

फोन अचानक बंद पडल्यामुळे गृहिणी गोंधळल्या. त्यांनी प्रयत्न करून फोन रीस्टार्ट केला. मात्र, फोन चालू होताच त्यांना एकामागून एक आलेले बँक मेसेज पाहून मोठा धक्का बसला. फोन बंद असतानाच्या अवघ्या काही मिनिटांत त्यांच्या बँक खात्यातून तीन वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे तब्बल ४४,५६० रुपये परस्पर काढून घेण्यात आले होते.

'इव्हेंट-बेस्ड मालवेअर फिशिंग'चा धोका सायबर तज्ज्ञांच्या मते, हा प्रकार 'इव्हेंट-बेस्ड मालवेअर फिशिंग स्कॅम' (Event-Based Malware Phishing Scam) या प्रकारात मोडतो.

  • अशी होते फसवणूक: भामटे स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, दिवाळी किंवा इतर मोठ्या सणांचा फायदा घेतात. अशा प्रसंगी देशभक्तीपर गाणी, शुभेच्छा संदेश किंवा सैनिकांसाठी निधी गोळा करण्याच्या नावाखाली बनावट लिंक्स पसरवल्या जातात.

  • असा मिळवला ताबा: पीडित महिला जेव्हा लिंकवर क्लिक करते, तेव्हा मोबाईलमध्ये एक धोकादायक व्हायरस/मालवेअर (Malware) प्रवेश करतो. हा व्हायरस फोनचा 'रिमोट ताबा' (Remote Access) मिळवतो. तात्पुरती स्क्रीन बंद करून हॅकर्स पडद्यामागे ओटीपी (OTP) आणि बँकिंग माहिती वापरून पैसे लांबवतात.

mumbai cyber fraud news
'हा फोटो तुमचाच काय?'... व्हॉट्सॲपच्या एका 'क्लिक'वर २७ हजार गायब

सायबर पोलिसांचे आवाहन: अशी घ्या काळजी

सण-उत्सवांच्या काळात सायबर गुन्हेगार लोकांच्या भावनांशी खेळून आर्थिक गंडा घालतात. नागरिक आणि गृहिणींनी खालील गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे:

  • अनोळखी लिंक्स टाळा: व्हॉट्सॲप, मेसेज किंवा सोशल मीडियावर आलेल्या कोणत्याही संशयास्पद किंवा अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.

  • अधिकृत ॲप्सचाच वापर करा: गाणी, व्हिडिओ किंवा इतर फाईल्स डाऊनलोड करण्यासाठी केवळ अधिकृत आणि विश्वासू (Google Play Store/App Store) ॲप्सचाच वापर करा.

  • तक्रार कुठे कराल?: असा कोणताही अनधिकृत व्यवहार झाल्यास किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक झाल्यास त्वरित १९३० (1930) या 'राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन' क्रमांकावर संपर्क साधा अथवा cybercrime.gov.in या अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवा.

Banco News
www.banco.news