
लातूर येथील प्रभात मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., लातूरची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच भक्ती शक्ती मंगल कार्यालय, पीव्हीआर-खाडगांव रोड, लातूर येथे संस्थेचे अध्यक्ष श्री. किशोर डाळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार श्री. वैजनाथ शिंदे, श्री. एस. आर. नाईकवाडी (सेवानिवृत्त, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था), श्री. समृत जाधव (जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर) व श्री. मधुकर गायकवाड (माजी कुलगुरु) हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. प्रास्ताविक संचालक प्रा. व्ही. एम. पाटील यांनी केले. अध्यक्ष श्री. किशोर डाळे यांनी अहवाल वाचन केले. त्यांनी सांगितले की, संस्थेच्या लातूर, उस्मानाबाद, उमरगा व तडवळा येथे शाखा आहेत. संस्थेचे ३१ मार्च २०२५ अखेर ५१२५ सभासद असून वार्षिक उलाढाल २९४ कोटीच्यावर आहे. संस्थेचे भागभांडवल ४ कोटी ८७ लाख ८० हजार, ठेवी ४३ कोटी २९ लाख ५९ हजार तर कर्ज वाटप २३ कोटी ४१ लाख ४७ हजार होते. मार्च २०२५ अखेर संस्थेस रू. ६ कोटी ७१ लाख ८४ हजार ४०९ एवढे उत्पन्न मिळाले असून सर्व खर्च व तरतूदी वजा जाता रू. ७८,३४,७०१.५७ एवढा निव्वळ नफा झाला आहे. यावर्षी सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर केला आहे.
संस्थेने जमा झालेल्या ठेवीतून २८ कोटी ६८ लाख २५ हजार एवढी गुंतवणूक केली आहे तर संस्थेचा स्वनिधी रू. २ कोटी ६५ लाख २१ हजार एवढा आहे. संस्था एक वर्षाच्या ठेवीवर ९ टक्केप्रमाणे व्याज देत असून कर्जाचा व्याजदर वाहन तारण, सोने तारण व पॉलिसी तारण कर्जासाठी ११ टक्के आहे, इतर सर्व प्रकारच्या कर्जासाठी १३ टक्के तर विनातारणी कर्जासाठी १५ टक्के आहे. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एच. आर. खोसे यांनी ठराव वाचन करून सभेपुढे विषय मांडले. त्यास टाळ्यांच्या गजरात सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
श्री. वैजनाथ शिंदे म्हणाले की, "प्रभात" सभासदांचा, ठेवीदारांचा तसेच कर्जदारांचा विश्वास संपादन करून वाटचाल करत आहे. संस्था स्थापनेपासून आपल्या सभासदांना लाभांश देते, दिवाळी मध्ये सभासदांना सवलतीच्या दरात साखर व तेलाचे वाटप करते, अशा सभासदांचे हित जोपासणाऱ्या संस्था वाढल्या पाहिजेत तरच सहकार टिकून राहील, असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रमुख पाहुणे श्री. एस. आर. नाईकवाडी यांनी संस्थेने शेतकरी सभासदांसाठी स्वतःचे गोदाम बांधून शेतमाल तारण योजना चालू करावी, अशी सूचना संचालक मंडळाला केली.
याप्रसंगी संस्थापक चेअरमन डॉ.संजय वाघमारे, व्हाईस चेअरमन डॉ. डी. बी. मोरे, माजी कुलगुरू श्री. मधूकर गायकवाड, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा उपनिबंधक श्री. समृत जाधव, यांनी सभासदांना मार्गदर्शन केले तसेच सभासद श्री. हरीदास लोमटे, श्री. डी. एम. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक डॉ. संजय मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक श्री.अजित गायकवाड यांनी केले. याप्रसंगी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.