
कोल्हापूर येथील राजर्षि शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेची १०८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात व खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच प्रतिभानगर हौसिंग सोसायटी हॉल, सागरमाळ, कोल्हापूर येथे पार पडली. बँकेचे संचालक श्री. विलासराव कुरणे यांनी सर्व सभासदांचे स्वागत केले.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश रा. शिंदे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषयांचे वाचन केले. अहवाल सालात निधन झालेल्या व्यक्तींना तसेच देशातील विविध स्तरातील थोर व्यक्ती, ठेवीदार, देशरक्षणार्थ धारातीर्थी पडलेले वीर जवान यांना श्रध्दाजंली वाहण्यात आली.
प्रास्ताविकामध्ये बँकेचे अध्यक्ष रोहित बांदिवडेकर यांनी बँकेने १०८ वर्षे पूर्ण केली असून बँकेने " १०९ व्या" वर्षात पदार्पण केले असल्याचे सांगून बँकेच्या सर्व सभासदांनी संचालक मंडळावर विश्वास दाखवून सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.
आपल्या पारदर्शक कारभाराद्वारे बँकेने ठेवींचा चढता आलेख कायम ठेवलेला असून आज बँकेकडे रु. २५० कोटी इतक्या ठेवी व कर्जे रु. १६५ कोटी असल्याचे सांगितले. बँकेचा एनपीए सलग पंधरा वर्षे ०% (शून्य टक्के) आहे. अहवाल सालात बँकेस ऑडिट वर्ग "अ" तसेच रिझर्व्ह बँकेचे "ग्रेड 1" मानांकन असल्याचे सांगितले. बँकेने RBI चे FSWM बाबतचे सर्व सात निकष पूर्ण केले असल्याने आपली बँक "आर्थिकदृष्ट्या सशक्त व योग्य व्यवस्थापन " असणारी बँक म्हणून गणली जात असल्याचे नमूद केले.
सेवानिवृत्त (पेन्शनर) कर्जदार सभासद मयत झालेस त्यांनी बँकेडून घेतलेल्या कर्जास १००% कर्जमाफी देणेचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. तसेच बँकेमार्फत सभासदांना लवकरच UPI सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले. बँकेच्या खर्चात कपात व्हावी यासाठी प्रधान कार्यालय येथे सोलर पॅनेल बसविले आहे. ज्यामुळे वीज बिलापोटी होणाऱ्या खर्चामध्ये बचत होणार आहे. त्याचबरोबर काही शाखांचे इमारत भाडेपोटी खर्च होत आहे. त्यामुळे बँकेच्या सर्व शाखा स्वमालकीच्या जागेमध्ये सुरु करण्याचा संचालक मंडळाचा मानस असलेचे नमूद केले.
बँकेने अहवाल सालात रक्कम रु.२ कोटी ५७ लाख इतका विक्रमी नफा मिळविलेला आहे हे बँकेच्या प्रगतीचे व स्थैयाचे प्रतिक असलेचे सांगितले.
सभासदांना वितरीत करणेत येणाऱ्या कर्जाची कमाल मर्यादा रु. २५ लाखावरुन वाढवून कर्जाची कमाल एकत्रित मर्यादा रु. ३० लाख इतकी करण्यात आली असल्याचे अध्यक्ष रोहित बांदिवडेकर यांनी जाहीर केले, भविष्यात कर्जाची मर्यादा आणखीन वाढविणार असलेचे नमूद करुन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दिलेली आश्वासने टप्याटप्प्याने पूर्ण करणार असल्याचे सांगितले.
सभासदांना सन २०२४-२५ सालासाठी गतवर्षपिक्षा जादा म्हणजेच ९% लाभांश देण्याचे जाहीर केले. बँकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी उपस्थित सभासदांना देण्यात आली.
सभेत विषयवार सविस्तर चर्चा होऊन ते सर्व विषय एकमताने हात उंचावून / आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. यावेळी बँकेचे कार्यक्षेत्र सात जिल्ह्याचे आहे. ते वाढवून बँकेचे कार्यक्षेत्र आणखीन तीन जिल्ह्यांमध्ये वाढवून एकूण १० जिल्ह्यामध्ये करण्याबाबतचा ठराव, तसेच अन्य दुरुस्त्या एकमताने मंजूर करण्यात आल्या.
सभासदांनी दिलेले लेखी प्रश्न व सूचनांचे निरसन संचालकांनी केले. यावेळी बँकेचे अध्यक्ष रोहित रोहिणी प्रकाश बांदिवडेकर, उपाध्यक्ष सदानंद रुक्मिणी व संतराव घाटगे, संचालक सर्वश्री रविंद्र सुशिला वसंतराव पंदारे, शशिकांत शांताबाई दिनकर तिवले, मधुकर आंबुबाई श्रीपती पाटील (एम.एस्.), अतुल मंगल गणपतराव जाधव, विलासराव अनुसया शंकरराव कुरणे, रमेश सरस्वती गणपती घाटगे, अजित सिंधुताई शंकर पाटील, संचालिका सौ. हेमा पाटील, श्रीमती. मनुजा रेणके, संचालक संजय आक्काताई सर्जेराव खोत, किशोर ताई रामचंद्र पोवार, अरविंद सुशिला भिमराव आयरे, प्रकाश शांताबाई भिमराव पाटील, तज्ञ संचालक दिपक केराबाई श्रीपतराव पाटील, गणपत पार्वती बाबुराव भालकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश सुलोचनादेवी रामराव शिंदे, मुख्य लेखापाल रुपेश पाटोळे व कर्मचारी उपस्थित होते. बँकेचे उपाध्यक्ष सदानंद घाटगे यांनी आभार मानले.