

कोल्हापूर : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) कोल्हापूर येथील एका सहकारी बँकेवर ४० हजार रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकेकडून रिझर्व्ह बँकेच्या ‘Inoperative Accounts / Unclaimed Deposits in Banks – Revised Instructions’ तसेच ‘Know Your Customer (KYC)’ नियमांचे पालन करण्यात त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.
रिझर्व्ह बँकेने ६ मे २०२६ रोजी हा आदेश जारी केला. बँकेची ३१ मार्च २०२५ रोजीची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन करण्यात आलेल्या वैधानिक तपासणीत काही नियामक त्रुटी समोर आल्या होत्या. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
तपासात असे आढळून आले कि , बँकेने काही निष्क्रिय (Inoperative) खाती ग्राहकांकडून आवश्यक KYC कागदपत्रे न घेता पुन्हा सक्रिय केली होती. ही बाब रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन मानण्यात आली.
बँकेने नोटिशीला उत्तर दिल्यानंतर आणि वैयक्तिक सुनावणीदरम्यान मांडलेल्या बाजूचा विचार करून रिझर्व्ह बँकेने दंडाची कारवाई कायम ठेवली. मात्र, ही कारवाई केवळ नियामक पालनातील त्रुटींवर आधारित असून ग्राहकांशी करण्यात आलेल्या व्यवहारांच्या वैधतेवर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे RBI ने स्पष्ट केले आहे.
रिझर्व्ह बँकेने पुढे असेही नमूद केले की, हा आर्थिक दंड भविष्यातील इतर संभाव्य कारवाईंना बाधा आणणारा नाही.