मोठ्या ठेवींवरील व्याजदर रोज जाहीर करावे लागणार : ठेवीदारांसाठी महत्त्वाचा निर्णय

बल्क डिपॉझिटवरील व्याजदर दररोज सकाळी संकेतस्थळावर जाहीर करणे बंधनकारक.
ठेवीदारांसाठी महत्त्वाचा निर्णय
ठेवीदारांसाठी महत्त्वाचा निर्णय
Published on

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांच्या बल्क डिपॉझिट (Bulk Deposits) संदर्भातील नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणाऱ्या नव्या नियमानुसार, बँकांना प्रत्येक कामकाजाच्या दिवसाच्या सुरुवातीला आपल्या संकेतस्थळावर मोठ्या ठेवींवरील अद्ययावत व्याजदर जाहीर करणे बंधनकारक राहणार आहे. दिवसभरात त्या व्याजदरात कोणताही बदल करता येणार नाही.

ठेवीदारांसाठी महत्त्वाचा निर्णय
रुपया घसरू द्या, व्याजदर वाढवू नका!

या निर्णयामुळे बँकांना त्यांच्या निधीची गरज, ठेवींचा प्रकार आणि तरलतेच्या (Liquidity) आवश्यकतेनुसार मोठ्या ठेवींवर वेगवेगळे व्याजदर निश्चित करण्याची अधिक लवचिकता मिळणार आहे.

काय बदलणार?

आतापर्यंत बँका ठेवीची रक्कम, मुदत आणि मुदतपूर्व पैसे काढण्याच्या अटी यांच्या आधारे व्याजदर ठरवत होत्या. आता त्यासोबतच ठेवी किती स्थिर आहेत किंवा त्या अल्पावधीत परत जाण्याची शक्यता किती आहे, याचाही विचार करून व्याजदर निश्चित करता येणार आहेत.

मात्र, एकदा दिवसासाठी जाहीर केलेले व्याजदर त्या दिवशी बदलता येणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांना त्या दिवसातील व्याजदरांबाबत निश्चितता मिळेल.

ठेवीदारांसाठी महत्त्वाचा निर्णय
रुपया सावरणार का? व्याजदर वाढीवर रिझर्व्ह बँकेचा संयमी दृष्टिकोन

एचडीएफसी बँक प्रकरणानंतर स्पष्ट नियम

अलीकडेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) ठेवी मिळविण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एचडीएफसी बँकेने आपल्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती. या पार्श्वभूमीवर RBI ने बल्क डिपॉझिटवरील व्याजदर निश्चित करण्यासाठी अधिक स्पष्ट आणि पारदर्शक नियम लागू केल्याचे मानले जात आहे.

सर्वसामान्य ठेवीदारांनाही फायदा

या नियमांचा थेट परिणाम मोठ्या ठेवींवर होणार असला तरी सर्वसामान्य मुदतठेवीदारांनाही त्याचा अप्रत्यक्ष लाभ मिळेल. बँकांच्या संकेतस्थळावर दररोज अद्ययावत व्याजदर उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना विविध बँकांतील व्याजदरांची तुलना करणे सोपे होईल. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता वाढण्यास आणि स्पर्धेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

सर्व शाखांमध्ये एकसमान व्याजदर

RBI ने स्पष्ट केले आहे की, एखाद्या बँकेने जाहीर केलेले व्याजदर त्या बँकेच्या सर्व शाखांमध्ये समान असले पाहिजेत. तसेच एकाच दिवशी स्वीकारलेल्या समान रकमेच्या आणि समान मुदतीच्या ठेवींवर वेगवेगळे व्याजदर देऊन कोणताही भेदभाव करता येणार नाही.

Banco News
www.banco.news