
कोणत्याही कागदपत्रांची किंवा उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. तुम्हाला २५ लाखांपर्यंतचे कर्ज त्वरित मिळवून देतो,असा व्हॉट्सॲप मेसेज पाठवून सायबर गुन्हेगारांनी एका पुणेकराला तब्बल १९ लाख रुपयांचा गंडा घातला.
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी एका प्रोव्हिजन स्टोअरमध्ये काम करणाऱ्या ३३ वर्षीय व्यक्तीने नुकतीच तक्रार दाखल केली आहे.
मे महिन्यात त्याला एका अज्ञात नंबरवरून या व्यक्तीला एक मेसेज आला. मेसेज पाठवणाऱ्याने स्वतःला एका वित्तीय सेवा कंपनीचा कार्यकारी अधिकारी असल्याचे कळवले होते. त्याने कोणत्याही कागदपत्रांशिवाय किंवा कागदपत्रे सादर न करता आणि उत्पन्नाच्या कोणताही पुराव्यशिवाय ५ ते २५ लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळवून देऊ, असा दावा केला होता.
पीडित व्यक्तीने कर्ज मिळविण्यात रस दाखवताच, त्यांनी विविध बहाण्यांनी त्याच्याकडून पैसे घेण्यास सुरुवात केली. त्यांनी कोणतीही निश्चित रक्कम न सांगता ते त्याला तुम्ही २५ लाख रुपयांपर्यंत कर्जासाठी पात्र असल्याचे सांगत होते. हे फसवणूक करणारे त्या व्यक्तीशी मेसेज आणि कॉलद्वारे संवाद साधत होते.
सुरुवातीला त्यांना कर्जाच्या प्रक्रिया शुल्काच्या बहाण्याने १,१५० आणि ९,५५० रुपये अशा लहान रकमा हस्तांतरित करण्यास सांगितले. मात्र, पुढील २० दिवसांत, प्रक्रिया शुल्क, कर्ज विमा, क्लिअरन्स शुल्क अशा खोट्या सबबी सांगून त्यांनी पीडित व्यक्तीकडून १०,००० ते ५०,००० रुपयांपर्यंतची रक्कम मागितली.
नंतर, फसवणूक करणाऱ्यांनी त्या व्यक्तीला अधिकाधिक पैसे देण्यास भाग पाडण्यास सुरुवात केली आणि अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई होतील अशी भीती दाखवली. ९ मे ते २९ मे दरम्यान, तक्रारदाराने नऊ वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण ५८ वेळा १९.५७ लाख रुपये ट्रान्सफर केले होते.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याने फक्त २० दिवसांत ५८ बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले.
पीडित व्यक्तीने कर्जाची रक्कम देण्याची मागणी करताच , फसवणूक करणारे तिच्या संपर्कात आले नाहीत.
अखेर त्याने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर, रीतसर तक्रार नोंदवण्यात आली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे गुन्हेगार पीडित व्यक्तीच्या आर्थिक असुरक्षिततेचा फायदा उठवत होते. पोलिसांनी आता संशयितांनी वापरलेल्या सेल नंबर आणि बँक खात्यांची कसून चौकशी सुरू केलेली आहे.