ज्येष्ठ मुंबईकराची सायबर फसवणूक: फ्रेंड रिक्वेस्ट पडली ९ कोटींना

ऑनलाइन व्यवहारांद्वारे चार महिलांकडून गंडा
cyber fraud
cyber fraud
Published on

मुंबईतील एका ८० वर्षीय वृद्धाची सायबर फसवणूक करून तब्बल ८.७ कोटी रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. सोशल मीडिया फ्रेंडशिप आणि सहानुभूतीच्या आडून या वृद्धाने महिलेला पाठवलेल्या फ्रेंड रिक्वेस्टद्वारे ही फसवणूक केली आहे. एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२५ या कालावधीत तब्बल ७३४ ऑनलाइन व्यवहार करत वृद्धाने वेगवेगळ्या चार महिलांना पैसे पाठवले. विशेष म्हणजे, पोलिसांच्या संशयानुसार या सगळ्या महिला प्रत्यक्षात एकच व्यक्ती असण्याचीही शक्यता आहे.

फसवणूक कशी सुरू झाली ?

या वृद्धाने एप्रिल २०२३ मध्ये फेसबुकवर ‘शर्वी’ नावाच्या महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. काही दिवसांनी तिनेही त्याला रिक्वेस्ट पाठवली व ती स्वीकारली गेली. चॅट सुरू झाले आणि त्यांचा संवाद व्हॉट्सअ‍ॅपवर पोहोचला. शर्वीने हळूहळू आपल्या कौटुंबिक अडचणी सांगत त्यांच्याकडे पैशांची मागणी केली.

पुढील काही महिन्यांत ‘कविता’, ‘दिनाझ’ आणि ‘जास्मिन’ नावाच्या महिलांनीही त्यांच्याशी असाच संपर्क साधत वेगवेगळ्या कारणांवरून पैसे उकळले. शर्वीच्या बहिणीने शर्वीच्या मृत्यूची खोटी कहाणी सांगत, तिच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट पाठवून रुग्णालयाचे बिल, आत्महत्येची धमकी देणे अशा पद्धतीने या ज्येष्ठाची भावनिक फसवणूक केली.

पैसे उधारीवर घेऊन देत राहिला

वृद्धाची सगळी बचत संपल्यानंतर त्याने सुनेकडून २ लाख आणि मुलाकडून ५ लाख रुपये उधार घेऊनही देत राहिला. अखेर मुलाने शंका व्यक्त करत चौकशी केली, तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला.

वृद्ध रुग्णालयात दाखल, डिमेंशियाचे निदान

फसवणुकीची जाणीव झाल्यावर अत्यवस्थ झालेल्या वृद्धाला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तीथे त्याला डिमेंशिया असल्याचे निदान झाले. या प्रकारामुळे त्याचे मानसिक संतुलनही बिघडलेले आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणी २२ जुलै २०२५ रोजी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी याबाबत या चारही महिलांचे प्रोफाइल एकाच फसवणूक करणाऱ्याने वापरले असावेत, असा अंदाज व्यक्त केला आहे. सखोल तपास सुरू आहे.

"सायबर गुन्हेगार प्रेम, सहानुभूती किंवा ओळखीच्या नावाखाली फसवणूक करत आहेत. सोशल मिडियावर कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी व्यक्तिगत माहिती आणि आर्थिक व्यवहार टाळा. तसेच वृद्धांच्या आर्थिक व्यवहारांवर कुटूंबातील सदस्यांनी लक्ष ठेवले पाहिजे. संशयास्पद वाटल्यास तात्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार करावी."

Banco News
www.banco.news