

मुंबई : कल्याणमधील पारनाका परिसरात ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून एका ६७ वर्षीय वृद्ध महिलेकडून तब्बल ६३ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. बँक खाते गैरव्यवहारात अडकल्याची खोटी भीती दाखवत भामट्यांनी तब्बल १५ दिवस महिलेला मानसिक दबावाखाली ठेवत आरटीजीएसच्या माध्यमातून पैसे उकळले, त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदा व भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरी उपेंद्र घारपुरे (वय ६७) असे तक्रारदार वृद्ध महिलेचे नाव आहे.
गौरी घारपुरे या आपल्या कुटुंबासोबत पारनाका येथील फडके रुग्णालयाजवळील बंगल्यात वास्तव्यास असून त्यांचे आयसीआयसीआय बँकेत खाते आहे. त्या नियमितपणे ऑनलाईन व्यवहार करत असतात.
तक्रारीनुसार, १५ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव संदीप राय असल्याचे सांगून, नाशिक येथील कॅनरा बँकेत त्यांच्या नावाने संशयित खाते असल्याचा दावा केला. त्या खात्यातून बेकायदेशीर आर्थिक व्यवहार होत असून, या प्रकरणात आपण संशयित असल्याचे सांगत त्यांना धाक दाखवण्यात आला.
“आपले कॅनरा बँकेत कोणतेही खाते नाही,” असे गौरी घारपुरे यांनी स्पष्ट केले. मात्र भामट्याने तुम्ही या प्रकरणात संशयित आहात, त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबीयांनी कुणालाही सांगितल्यास अटक केली जाईल, अशी धमकी दिली. याशिवाय माध्यमांसमोर आणून बदनामी करू, असेही सांगण्यात आले.
या धमक्यांमुळे वृद्ध महिला प्रचंड तणावाखाली आल्या.
यानंतर संदीप रायने व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधत पोलिसी गणवेशातील दोन व्यक्ती दाखवल्या. त्यांनी स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवून “तुमचे खाते संरक्षित करण्यासाठी आम्ही मदत करू,” असे सांगितले.
या बनावट कारवाईमुळे गौरी घारपुरे यांचा पूर्ण विश्वास बसला.
“खाते सुरक्षित करण्याच्या” बहाण्याने भामट्यांनी वृद्ध महिलेला करूर वैश्य बँक, इंडसइंड बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया येथील खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले.
१५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत, आरटीजीएसद्वारे एकूण ६३ लाख ५० हजार रुपये विविध खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले. नंतर हा सर्व पैसा भामट्याने परस्पर काढून घेतल्याचे निष्पन्न झाले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गौरी घारपुरे यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा व भारतीय न्याय संहितेअंतर्गत संदीप राय विरोधात गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की,
कोणतीही सरकारी यंत्रणा ‘डिजिटल अरेस्ट’ करत नाही
फोन किंवा व्हिडीओ कॉलवरून बँक खाते संरक्षित करण्यासाठी पैसे मागितले जात नाहीत
अशा कॉल्स आल्यास त्वरित पोलीस किंवा सायबर हेल्पलाईनशी संपर्क साधावा
डिजिटल फसवणुकीचे प्रकार वाढत असताना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे या घटनेतून स्पष्ट होते.