

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) ताज्या अर्धवार्षिक अहवालानुसार, भारताचा सोन्याचा साठा ऐतिहासिक पातळीवर पोहोचला आहे. सप्टेंबर २०२५ अखेर रिझर्व्ह बँकेकडे ८८०.१८ मेट्रिक टन सोने होते, जे सप्टेंबर २०२४ च्या तुलनेत २५.४५ मेट्रिक टनांनी अधिक आहे.
गेल्या एका वर्षात भारताच्या सोन्याच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सप्टेंबर २०२४ अखेरीस सोन्याचा साठा ८५४.७३ मेट्रिक टन होता, तर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीअखेर तो ८८०.१८ मेट्रिक टनांवर पोहोचला.
या साठ्यातील ५७५.८२ मेट्रिक टन सोने देशांतर्गत ठेवलेले असून, उर्वरित २९०.३७ मेट्रिक टन सोने बँक ऑफ इंग्लंड (BoE) आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स (BIS) येथे सुरक्षित कोठडीत ठेवण्यात आले आहे. तसेच १३.९९ मेट्रिक टन सोने ठेवींच्या स्वरूपात आहे.
आरबीआयच्या अहवालानुसार, सप्टेंबर २०२५ अखेरीस देशाचा एकूण परकीय चलन साठा ७००.०९ अब्ज अमेरिकन डॉलर्स होता. मार्च २०२५ अखेरीस हा साठा ६६८.३३ अब्ज डॉलर्स होता, म्हणजेच सहामाहीत जवळपास ३२ अब्ज डॉलर्सची वाढ झाली. तथापि, सप्टेंबर २०२४ च्या तुलनेत (७०५.७८ अब्ज डॉलर्स) किंचित घट झाली आहे.
अहवालात नमूद करण्यात आले आहे की, डॉलर मालमत्तांमधील घट लक्षात घेता, परकीय चलन साठ्यात सोन्याचा वाटा मार्च २०२५ अखेरीस ११.७०% वरून सप्टेंबर २०२५ अखेरीस १३.९२% पर्यंत वाढला आहे. ही वाढ आरबीआयच्या राखीव व्यवस्थापनातील “diversification strategy” चा परिणाम असल्याचे अहवालात म्हटले आहे.
अहवालात नमूद आहे की भारताच्या राखीव व्यवस्थापनाचे उद्दिष्ट जगातील अनेक मध्यवर्ती बँकांप्रमाणेच आहे. सुरक्षितता (Safety), तरलता (Liquidity) आणि परतावा (Return) या तीन बाबींमध्ये संतुलन राखणे. राखीव साठ्यावर मागणी ही देशाच्या विनिमय दर धोरण, GDP, आणि जागतिक आर्थिक स्थितीवर अवलंबून असते.
सोन्याचा साठा आणि परकीय चलन साठा या दोन्ही आकडेवारी भारताच्या आर्थिक स्थैर्याचा द्योतक आहेत. रिझर्व्ह बँकेच्या राखीव व्यवस्थापन धोरण हे जोखमींच्या नियंत्रणासह स्थिर परतावा आणि मजबूत चलन संतुलन राखण्यासाठी दिशादर्शक ठरत आहे.