
आजरा येथील आजरा अर्बन को-ऑप. बँकेची (मल्टिस्टेट) ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अण्णा भाऊ सभागृहात खेळीमेळीत पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना अध्यक्ष अशोक चराटी म्हणाले की, "बँकेने एक हजार कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला आहे. देशभरातील १४५७ नागरी सहकारी बँकांच्या यादीत पहिल्या ५० मध्ये आपल्या आजरा को-ऑप. बँकेचा समावेश झालेला आहे."
चराटी म्हणाले, "बँकेच्या प्रगतीमध्ये आण्णा भाऊंच्या सोबत असणाऱ्या सर्वांचे योगदान आहे. ३५ वर्षे सतत 'अ' वर्ग मिळालेला आहे. बँकेकडे ६५५ कोटी ८४ लाख इतकी कर्जे आहेत. आण्णासाहेब पाटील, सोनेतारण, घरबांधणी, घर खरेदी, वाहन तारण अशा अनेक सुविधा अल्प व्याज दरात उपलब्ध केल्या आहेत. बँकेला ४४७ कोटी ६३ लाख इतक्या गुंतवणुकीतून २८ कोटी ११ लाख इतके उत्पन्न मिळाले, तर ६ कोटी ८४ हजार इतका निव्वळ नफा झालेला आहे."
डॉ. दीपक सातोस्कर यांनी श्रद्धांजली ठराव मांडला. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी नोटीस वाचन केले. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
सभेला सर्व संचालक तसेच मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहायक सरव्यवस्थापक तानाजी गोविलकर यांनी सूत्रसंचालन केले. संचालक विलास नाईक यांनी आभार मानले.