
एटीएममधून पैसे काढण्यासाठी सोबत एटीएमकार्ड असावेच लागते. मात्र,अनेकदा घाई-गडबडीत एटीएम कार्ड घरी राहते आणि पैशांची गरज असते. अशा वेळी ग्राहक अडचणीत येतात. पण आता अशी वेळ येणार नाही. कारण नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) लवकरच एक नवा पर्याय घेऊन येत आहे, ज्यामुळे एटीएम कार्डशिवाय फक्त मोबाईलच्या मदतीने रक्कम काढता येणार आहे.
"यूपीआय" आधारित नवी सुविधा:
देशात यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहार वेगाने वाढले आहेत. ऑनलाइन खरेदी, भरणे, बिल पेमेंट यासाठी मोठ्या प्रमाणावर यूपीआयचा वापर होत आहे. आता रक्कम काढण्यासाठीही यूपीआयचा वापर करता येणार आहे. लवकरच ग्राहकांना २० लाखांहून अधिक बिझनेस करस्पॉन्डंट (BC) आउटलेट्सवर (व्यवसाय प्रतिनिधी केंद्रांवर) यूपीआयद्वारे पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे.
कशी असेल ही सुविधा?:
या योजनेअंतर्गत ग्राहकाला फक्त त्यांच्या मोबाईलवरील कोणत्याही यूपीआय ॲपद्वारे QR कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर ठराविक रक्कम निवडून व्यवहार पूर्ण केल्यावर रोख रक्कम तात्काळ मिळेल.
* सध्या निवडक एटीएम आणि काही दुकानांमध्ये ही सुविधा उपलब्ध असल्यातरी त्यालाही मर्यादा आहे.
* शहरांमध्ये प्रति व्यवहार १,००० रुपये आणि ग्रामीण भागात २,००० रुपये इतकीच मर्यादा ठेवण्यात आली आहे.
* मात्र, प्रस्तावित योजनेनुसार, BC आउटलेट्सवर प्रत्येक व्यवहारामध्ये आता १०,००० रुपयांपर्यंत पैसे काढता येणार आहेत .
देशभरात सर्वत्र उपलब्ध होणार सेवा:
सरकार आणि NPCI या सुविधेला देशभरातील २० लाखांहून अधिक BC आउटलेट्सपर्यंत ही सुविधा पोहोचवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे लहान दुकाने, सेवा केंद्रे किंवा ग्रामीण भागातील बिझनेस करस्पॉन्डंट्स देखील ग्राहकांना एटीएमप्रमाणेच पैसे देऊ शकतील.
RBI ची परवानगी मागितली:
या योजनेला परवानगी मिळावी म्हणून NPCI ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (RBI) प्रस्ताव सादर केला आहे. परवानगी मिळाल्यानंतर देशभरात एटीएम कार्डशिवाय केवळ यूपीआयद्वारे रक्कम काढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
UPI नियमांमध्ये केलेले बदल:
NPCI ने अलीकडेच यूपीआयच्या नियमांमध्येही बदल केले आहेत. आता विमा, गुंतवणूक, प्रवास, क्रेडिट कार्ड बिले यांसारख्या क्षेत्रांत व्यवहाराची मर्यादा वाढवण्यात आली आहे. मोठ्या डिजिटल पेमेंट्स अधिक सुलभ व्हावीत आणि ग्राहकांना अधिक पर्याय मिळावेत हा त्यामागचा उद्देश आहे.
थोडक्यात: लवकरच ग्राहकांना रक्कम मिळवण्यासाठी एटीएम कार्ड बाळगण्याची गरज राहणार नाही. मोबाईलमधील यूपीआय ॲप वापरून QR कोड स्कॅन करून १०,००० रुपयांपर्यंत रक्कम काढता येणार आहे. २० लाखांहून अधिक बिझनेस करस्पॉन्डंट्समार्फत देशभरात ही सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे.