

बेळगाव: सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमध्ये “डिजिटल अरेस्ट” हा नवा आणि धोकादायक प्रकार समोर येत आहे. बेळगाव येथे अशाच प्रकारात ८१ वर्षीय व्यावसायिकाला तब्बल १५ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला असून, या घटनेने संपूर्ण बँकिंग व आर्थिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायबर भामट्यांनी स्वतःला केंद्रीय तपास यंत्रणेचे (CBI) अधिकारी असल्याचे भासवले. त्यांनी संबंधित व्यावसायिकाशी सातत्याने फोन आणि व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क ठेवला. सुमारे सहा आठवड्यांच्या कालावधीत त्यांनी भीती, दबाव आणि अधिकाराचा आभास निर्माण करून व्यावसायिकाला पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणात ठेवले.
भामट्यांनी व्यावसायिकाला सांगितले की, त्यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभागाचा आरोप आहे. २५ लाख रुपयांच्या व्यवहारात ५ लाखांचे कमिशन घेतल्याचा आरोप करत, त्यांच्याविरुद्ध तक्रारी दाखल झाल्याचेही सांगण्यात आले.
“तुम्हाला अटक होऊ शकते” अशी धमकी देत भामट्यांनी व्यावसायिकाला “डिजिटल अरेस्ट” मध्ये असल्याचे सांगितले. या नावाखाली -
बाहेरील कोणाशीही संपर्क करू नये
सर्व सूचना फक्त “अधिकाऱ्यांकडून” घ्याव्यात
तपास पूर्ण होईपर्यंत गोपनीयता राखावी
अशा अटी घालण्यात आल्या. यामुळे व्यावसायिक मानसिकदृष्ट्या पूर्णपणे एकाकी पडले.
भामट्यांनी “तपासासाठी निधी सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे” असे सांगून व्यावसायिकाकडून बँक खात्यांची माहिती घेतली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सुमारे १५ कोटी रुपये विविध खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यास भाग पाडले.
महत्त्वाचे म्हणजे, हे पैसे तपास पूर्ण झाल्यानंतर परत मिळतील, असे खोटे आश्वासनही देण्यात आले.
निर्देशानुसार सर्व व्यवहार पूर्ण झाल्यानंतर व्यावसायिकाने संबंधित “अधिकाऱ्यांशी” संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोन आणि इतर सर्व संपर्क पूर्णपणे बंद झाले होते. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली.
कोणतीही सरकारी यंत्रणा फोन/व्हिडिओ कॉलवर “अटक” जाहीर करत नाही
“डिजिटल अरेस्ट” ही अधिकृत संकल्पना नाही - तो फसवणुकीचा भाग आहे
अनोळखी व्यक्तींना बँक तपशील, OTP, पासवर्ड देऊ नका
मोठे व्यवहार करण्यापूर्वी कुटुंबीय किंवा बँकेशी चर्चा करा
सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 हेल्पलाइन किंवा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधा