सोलापूर: चित्रपटात शोभेल असा एक धक्कादायक आणि तितकाच थरारक प्रकार सोलापूर शहरात घडला आहे. चोरट्यांनी चक्क स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) अख्खे एटीएम मशिनच गाडीला दोरी बांधून उपटून नेले. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास विडी घरकुलमधील सग्गम नगर भागात ही घटना घडली. या मशिनमध्ये १ लाख ७९ हजार १०० रुपये होते. चोरी केल्यानंतर गुगल मॅपचा (Google Maps) वापर करून गावागावातील अंतर्गत रस्त्यांवरून पळ काढणारे हे चोरटे पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाले असले, तरी रविवारी पोलिसांनी बक्षीहिप्परगा येथील एका शेतातून रिकामे एटीएम मशिन जप्त केले आहे.
सग्गम नगर येथील ‘एसबीआय’च्या एटीएमवर कोणताही सुरक्षारक्षक नव्हता, तसेच मशिनला मजबूत फाउंडेशनही नव्हते. याचाच फायदा चोरट्यांनी उठवला. एका मालवाहतूक गाडीच्या साहाय्याने, मशिनला दोरी बांधून ती जागेवरून उखडण्यात आली आणि गाडीत भरून चोरटे अवघ्या ५ ते ७ मिनिटांत तिथून पसार झाले. जाताना चोरट्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी एटीएम केंद्रातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर (DVR) देखील सोबत नेला.
चोरट्यांनी मशिन उखडताच मुंबईतील बँकेच्या मुख्य स्ट्राँग रूममध्ये अलार्म वाजला. तिथून तात्काळ सोलापूर पोलिसांना वायरलेसवर संदेश देण्यात आला. माहिती मिळताच अवघ्या सातव्या मिनिटाला पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत चोरटे सोलापूर शहराच्या हद्दीबाहेर पडले होते. पोलिसांनी तात्काळ शहरभर नाकाबंदी केली, परंतु चोरट्यांचा माग लागला नाही.
सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. चोरटे हैदराबाद रोडवरून विरुद्ध दिशेने मुळेगाव रोडकडे गेले. पोलिसांनी उळे रोड ते बक्षीहिप्परगा परिसरातील सीसीटीव्ही तपासले. या दोन गावांमध्ये केवळ १० किलोमीटरचे अंतर आहे. परंतु, चोरट्यांच्या गाडीला हे अंतर पार करण्यासाठी चक्क १ तास लागला. याच एका तासाच्या गॅपचा संशय आल्यामुळे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे यांच्या पथकाने बक्षीहिप्परगा परिसरात शोध मोहीम राबवली असता, तेथील एका शेतात पोलिसांना पैशांशिवाय रिकामी झालेली एटीएम मशिन सापडली.
गुगल मॅपचा वापर: चोरट्यांनी महामार्ग किंवा मुख्य रस्ते टाळून पोलिसांपासून वाचण्यासाठी अंतर्गत ग्रामीण रस्त्यांचा वापर केला. यासाठी त्यांनी मोबाईलवर 'गुगल मॅप'चा वापर केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
नंबर प्लेट गायब: चोरट्यांनी वापरलेल्या मालवाहतूक गाडीला मागच्या बाजूला नंबरप्लेट नव्हती, तर पुढच्या बाजूची नंबरप्लेट हेडलाईटच्या तीव्र प्रकाशामुळे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत नाहीये.
१५ गावांचे फुटेज तपासले: शहर गुन्हे शाखेच्या ४ पथकांनी मार्डी ते धाराशिव टोल नाक्यापर्यंतच्या सुमारे १५ गावांमधील १०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत.
या एटीएममध्ये ३-४ दिवसांपूर्वीच दोन लाख रुपये भरण्यात आले होते, त्यापैकी १ लाख ७९ हजार १०० रुपये मशिनमध्ये होते, जे चोरट्यांनी लंपास केले आहेत. या प्रकरणी किरण संजय लांडगे (रा. स्वातंत्र्य सैनिक नगर, सोलापूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, अशाच प्रकारच्या एटीएम चोऱ्या राज्यातील इतर जिल्ह्यांतही झाल्या आहेत का? याची माहिती आता सोलापूर पोलीस घेत असून तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या माध्यमातून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी यंत्रणा तैनात करण्यात आली आहेत.