मुंबई: आयुष्यात अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय किंवा इतर तातडीच्या आर्थिक अडचणींच्या वेळी "अवघ्या काही मिनिटांत कर्ज उभं राहू शकतं का?" हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. याचे उत्तर 'होय' असे आहे. मात्र, त्यासाठी बँकेची एक विशिष्ट प्रक्रिया आणि ग्राहकाची पात्रता कारणीभूत ठरते.
सामान्य वैयक्तिक कर्जासाठी (Personal Loan) बँकांना २४ तासांपासून ते २-३ दिवसांचा कालावधी लागतो. परंतु, 'प्री-अप्रूव्ड पर्सनल लोन' (Pre-approved Personal Loan) च्या माध्यमातून अवघ्या २ मिनिटांत किंवा काही क्षणांत कर्जाची रक्कम थेट खात्यात जमा होणे शक्य झाले आहे.
ज्या बँकेत तुमचे खाते आहे किंवा ज्या बँकेकडून तुम्ही याआधी व्यवहार/कर्ज घेतले आहे, ती बँक तुमचा क्रेडिट इतिहास, उत्पन्न आणि पूर्वीची कागदपत्रे तपासून तुम्हाला ही ऑफर देते. बँकेकडे ग्राहकाची माहिती आधीच नोंदवलेली असल्याने नव्याने संपूर्ण पडताळणी करण्याची गरज पडत नाही. ग्राहकाने ऑफर स्वीकारताच रक्कम थेट बँक खात्यात ट्रान्सफर होते.
झटपट कर्ज मंजुरीसाठी खालील अटी पूर्ण असणे आवश्यक आहे:
नागरिकत्व: अर्जदार भारतीय नागरिक असावा.
वयोमर्यादा: वय २१ ते ८० वर्षांच्या दरम्यान असावे.
रोजगार: अर्जदार नोकरदार (Salaried) किंवा व्यावसायिक (Self-employed) असावा.
सिबिल स्कोअर (CIBIL Score): सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सिबिल स्कोअर ७५० किंवा त्याहून अधिक असावा.
जरी ही प्रक्रिया डिजिटल असली, तरी बँकेकडे तुमचे 'केवायसी' (KYC) अद्ययावत असणे गरजेचे आहे:
ओळख व पत्त्याचा पुरावा: पॅन कार्ड, ओळखपत्र किंवा पासपोर्ट.
उत्पन्नाचा पुरावा: बँक स्टेटमेंट, पगाराची स्लिप (Salary Slip) आणि नोकरीचे ओळखपत्र.
१. संबंधित बँकेच्या किंवा वित्तीय संस्थेच्या अधिकृत लोन पेज/ॲपवर जा.
२. 'Check Offer' या पर्यायावर क्लिक करा.
३. नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि प्राप्त झालेला OTP टाकून पडताळणी करा.
४. स्क्रीनवर दिसणारी मंजूर झालेली रक्कम स्वीकारा किंवा गरजेनुसार रक्कम व परतफेडीचा कालावधी (Tenure) निवडा.
५. 'Proceed' वर क्लिक करा. अंतिम मंजुरी मिळताच रक्कम त्वरित खात्यात जमा होईल.
घाईगडबडीत कर्ज घेताना फसवणूक टाळण्यासाठी खालील गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे:
अधिकृत संस्था: कर्ज नेहमी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नोंदणीकृत बँक कडूनच घ्यावे.
बनावट ॲप्सपासून सावधान: कोणतेही ॲप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची विश्वासार्हता तपासा.
लपलेले शुल्क: प्रोसेसिंग फी, हिडन चार्जेस, व्याजाचा दर आणि परतफेडीच्या अटी आधीच स्पष्टपणे समजून घ्या.
(टीप: कर्ज मिळण्याची प्रक्रिया जुन्या व नवीन ग्राहकांसाठी वेगळी असू शकते. अधिक माहितीसाठी आपल्या बँकेशी थेट संपर्क साधावा.)