"माझं उत्पन्न कराच्या कचाट्यात येत नाही, मग मला पॅन कार्डची काय गरज?" किंवा "पॅन कार्ड तर फक्त वर्षाच्या शेवटी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठीच लागतं ना?"... जर तुमचाही असाच काहीसा गैरसमज असेल, तर आताच सावध व्हा! वरकरणी केवळ कर भरण्यासाठी ओळखले जाणारे हे प्लास्टिकचे छोटे कार्ड आता तुमच्या प्रत्येक मोठ्या खरेदीवर आणि छुप्या आर्थिक व्यवहारांवर गुप्तपणे नजर ठेवून आहे.
सर्वसामान्यांपासून ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांनाच खालील व्यवहारांवर पॅन कार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे:
तुम्ही राहते घर, दुकान, व्यावसायिक गाळा किंवा शेतजमीन खरेदी अथवा विक्री करण्याचा विचार करत असाल, आणि जर या व्यवहाराची किंमत २० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर पॅन कार्ड सादर करणे सक्तीचे आहे.
लग्नाचा बस्ता असो, सोन्या-चांदीचे दागिने असो किंवा कोणतीही महागडी सेवा; जर तुम्ही २ लाख रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या कोणत्याही वस्तू किंवा सेवांची रोख अथवा इतर मार्गाने खरेदी करत असाल, तर तिथे पॅन नंबर देणे आवश्यक असते.
शेअर बाजारात अधिकृतपणे नोंदणी नसलेले (Unlisted) शेअर्स खरेदी किंवा विक्री करताना विशेष काळजी घ्यावी लागते. जर अशा अनलिस्टेड शेअर्सच्या व्यवहाराची रक्कम १ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर पॅन कार्ड आवश्यक लागते.
दुचाकी किंवा चारचाकी गाड्या घेतानाही पॅन कार्डचा नियम लागू होतो. ५ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची कार किंवा कोणतीही हाय-एंड बाईक खरेदी करताना ग्राहकाला पॅन कार्ड देणे बंधनकारक आहे.
तुम्हाला शेअर बाजारात, म्युच्युअल फंडात नशीब आजमावायचे असेल किंवा ट्रेडिंग करायचे असेल, तर त्यासाठी डीमॅट खाते (Demat Account) उघडावे लागते. या खात्यासाठी आणि इतर कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीच्या वेळी पॅन कार्डशिवाय एक पाऊलही पुढे टाकता येत नाही.
अनेकदा लोक घाईगडबडीत किंवा हेतुपरस्पर चुकीचा पॅन नंबर देतात. पण असे करणे आता महागात पडू शकते.
एखाद्या व्यक्तीने जाणीवपूर्वक चुकीचा किंवा बनावट पॅन नंबर दिला, तर प्राप्तिकर विभागाकडून १०,००० रुपयांपर्यंतचा थेट दंड ठोठावला जाऊ शकतो. एवढेच नाही तर, चुकीच्या माहितीमुळे तुमचे 'टॅक्स क्रेडिट' अडकू शकते आणि आयकर विभागाच्या रडारवर आल्यामुळे तुम्हाला अतिरिक्त चौकशीला सामोरे जावे लागू शकते.
तुम्हाला वाटत असेल की आपण केलेला व्यवहार कोणाला कसा कळणार? तर त्याचे उत्तर प्राप्तिकर विभागाच्या आधुनिक प्रणालीमध्ये दडलेले आहे.
जेव्हा तुम्ही एखाद्या व्यवहारासाठी पॅन कार्ड जोडता, तेव्हा ती सर्व माहिती आयकर विभागाच्या TDS (Tax Deducted at Source), TCS (Tax Collected at Source) आणि AIS (Annual Information Statement) या हायटेक प्रणालीमध्ये आपोआप नोंदवली जाते. तुमच्या आयटीआर (ITR) मध्ये दाखवलेले वार्षिक उत्पन्न आणि तुमच्या पॅन कार्डवर नोंदवलेले मोठे व्यवहार (उदा. मोठी खरेदी किंवा गुंतवणूक) यात जर तफावत आढळली, तर आयकर विभाग तुम्हाला थेट नोटीस पाठवू शकतो आणि पैशांच्या स्रोताबाबत (Source of Income) स्पष्टीकरण मागू शकतो.
प्राप्तिकर नियम २०२६ अंतर्गत, ज्या नागरिकांकडे काही कारणास्तव अद्याप पॅन कार्ड उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी 'फॉर्म ९७' (Form 97) ची विशेष सुविधा देण्यात आली आहे. हा फॉर्म भरून पॅन कार्ड नसलेले लोक काही ठराविक आणि मर्यादित व्यवहार करू शकतात.
पण लक्षात ठेवा... हा फॉर्म प्रत्येक व्यवहारासाठी पॅन कार्डला पूर्ण पर्याय ठरू शकत नाही. काही कायदेशीर आणि मोठ्या आर्थिक प्रक्रियांमध्ये पॅन कार्ड असणेच अनिवार्य असते. त्यामुळे भविष्यातील कायदेशीर कटकटी आणि दंड टाळायचा असेल, तर आपले पॅन कार्ड अपडेट ठेवा आणि प्रत्येक व्यवहाराच्या वेळी अचूक पॅन नंबर देण्याची खबरदारी घ्या!