Credit Card Hacks: क्रेडिट कार्डचे ८ छुपे नियम; आजच बदला 'या' सवयी आणि करा पैशांची मोठी बचत! 
Arth Warta

क्रेडिट कार्ड वापरताय? आधी 'हे' ८ सिक्रेट चार्जेस जाणून घ्या

ऑफर्सच्या मोहात पडण्यापूर्वी वाचा क्रेडिट कार्डचे 'ते' सिक्रेट चार्जेस, ज्यामुळे होतोय खिसा खाली!

Prachi Tadakhe

आजच्या डिजिटल आणि आधुनिक युगात 'क्रेडिट कार्ड' (Credit Card) हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. खिशात पैसे नसतानाही शॉपिंग करण्याची सोय, आकर्षक कॅशबॅक आणि रिवॉर्ड पॉइंट्सच्या मोहामुळे प्रत्येक सुशिक्षित तरुणाच्या पाकिटात आज किमान एक तरी क्रेडिट कार्ड पाहायला मिळते. परंतु, क्रेडिट कार्ड हे एका 'दुधारी तलवारी'सारखे आहे, हे आपण विसरता कामा नये. जर याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक केला नाही, तर यावर लागणारे छुपे चार्जेस (Hidden Charges) तुम्हाला कधी कर्जाच्या खाईत ढकलतील, हे तुमचे तुम्हालाच समजणार नाही.

अनेकांना वाटतं की क्रेडिट कार्ड वापरणे म्हणजे मोफत पैसे वापरण्यासारखे आहे, पण यात अनेक 'हिडन कंडीशन्स' असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच ८ महत्त्वाच्या छुप्या चार्जेसविषयी सांगणार आहोत, जे माहिती नसल्यास तुमचे बजेट पूर्णपणे कोलमडू शकते.

१. सर्वात मोठा विळखा: 'मिनिमम अमाउंट ड्यू' आणि चक्रवाढ व्याज

क्रेडिट कार्डचे बिल आल्यावर अनेक जण संपूर्ण बिल भरण्याऐवजी फक्त 'मिनिमम अमाउंट ड्यू' (Minimum Amount Due) भरून मोकळे होतात. बँकही ग्राहकांना हा पर्याय देऊन भुरळ पाडते. पण हा सर्वात मोठा ट्रॅप आहे. तुम्ही मिनिमम रक्कम भरली तरीही उर्वरित रकमेवर बँक दरमहा ३% ते ४% म्हणजेच वर्षाला तब्बल ३६% ते ४५% पर्यंत व्याज वसूल करते. हे व्याज जगातील कोणत्याही कर्जापेक्षा जास्त आहे.

२. एटीएममधून रोख रक्कम काढणे (Cash Advance Fees)

बणी-अडचणीच्या काळात अनेक जण क्रेडिट कार्डचा वापर एटीएममधून पैसे काढण्यासाठी करतात. पण लक्षात ठेवा, हा पर्याय अत्यंत महागडा आहे. तुम्ही एटीएममधून कॅश काढताच बँक तुमच्याकडून 'कॅश अडव्हान्स फीस' वसूल करते. इतकेच नाही तर, इतर बिलांप्रमाणे यासाठी कोणतीही 'ग्रेस पिरियड' (व्याजमुक्त कालावधी) मिळत नाही; पैसे काढल्याच्या पहिल्याच दिवसापासून त्यावर प्रचंड व्याज आकारले जाते.

३. इंधन खरेदीवरील भुर्दंड (Fuel Surcharge)

गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरताना सर्रास क्रेडिट कार्ड स्वाइप केले जाते. पण अनेक कार्ड्सवर इंधन भरल्यास १% किंवा त्यापेक्षा जास्त 'फ्युएल सरचार्ज' (Fuel Surcharge) लावला जातो. काही बँका हा सरचार्ज माफ (Waiver) करण्याचा दावा करतात, पण त्यासाठीही मासिक खर्चाची मर्यादा किंवा विशिष्ट पेट्रोल पंपांची अट असते, जी सामान्य ग्राहक वाचत नाहीत.

४. परदेशी व्यवहारांवरील कर (Foreign Currency Markup Fee)

इंटरनॅशनल ट्रॅव्हल दरम्यान किंवा परदेशी वेबसाइट्सवरून (उदा. Netflix, Amazon US किंवा इतर आंतरराष्ट्रीय ब्रँड्स) शॉपिंग करताना क्रेडिट कार्ड वापरणे सोपे वाटते. परंतु, जेव्हा तुम्ही परदेशी चलनात (Foreign Currency) पेमेंट करता, तेव्हा बँक २% ते ४.५% पर्यंत 'फॉरेक्स मार्कअप फीस' वसूल करते. हे एका प्रकारचे हिडन करेन्सी कन्व्हर्जन चार्ज असते.

५. मर्यादा ओलांडल्यास 'ओव्हर लिमिट फीस' (Over Limit Fee)

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि खरेदीचा मोह वाढवण्यासाठी बँका बऱ्याचदा कार्डच्या ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा (Credit Limit) थोडे जास्त पैसे खर्च करण्याची सूट देतात. पण ही सूट मोफत नसते. तुम्ही लिमिट पार करताच बँक तुमच्यावर किमान ५०० रुपये किंवा ओव्हरलिमिट केलेल्या रकमेच्या १ टक्का एवढी 'ओव्हर लिमिट फीस' ठोकते.

६. लेट पेमेंट फी (Late Payment Fee)

जर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही, तर व्याजाव्यतिरिक्त बँक मोठी 'लेट पेमेंट फी' लावते. ही फी तुमच्या एकूण बिलाच्या रकमेनुसार १०० रुपयांपासून ते १,३०० रुपयांपर्यंत असू शकते. यामुळे केवळ पैशांचे नुकसान होत नाही, तर तुमचा सिबिल स्कोअर (CIBIL Score) देखील खराब होतो.

७. वार्षिक आणि नूतनीकरण शुल्क (Annual & Renewal Fees)

अनेक बँका 'Life Time Free' चा दावा करून कार्ड विकतात. पण अनेकदा त्यात अटी असतात, जसे की वर्षाला किमान १ लाख रुपये खर्च केले तरच फी माफ होईल. जर तुम्ही ती मर्यादा पूर्ण केली नाही, तर वर्षाच्या शेवटी बँक ५०० ते ५,००० रुपयांपर्यंत वार्षिक शुल्क बिलात जोडून पाठवते.

८. जीएसटी (GST @18%)

क्रेडिट कार्डच्या कोणत्याही व्यवहारावर किंवा वर नमूद केलेल्या सर्व शुल्कांवर (व्याज, लेट फी, प्रोसेसिंग फी) सरकारचा १८% जीएसटी (GST) लागू होतो. म्हणजेच छुपे चार्जेस जेवढे जास्त, तेवढा त्यावर लागणारा जीएसटीही जास्त असतो.

क्रेडिट कार्डचा योग्य आणि शिस्तबद्ध वापर केला तर ते फायदेशीर ठरते, पण थोडीही चूक तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटात टाकू शकते. या सर्व छुप्या चार्जेसपासून स्वतःचा बचाव करण्याचा एकमेव आणि उत्तम मार्ग म्हणजे - कार्ड घेताना किंवा वापरण्यापूर्वी त्याचे 'नियम आणि अटी' (Terms & Conditions) चे डॉक्युमेंट अत्यंत काळजीपूर्वक वाचा. दरमहा क्रेडिट कार्डचे बिल '१००% पूर्ण' भरा आणि स्वतःला कर्जाच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवा.

SCROLL FOR NEXT