दि यवतमाळ अर्बन बँक 
Co-op Banks

दि यवतमाळ अर्बन बँकेतर्फे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त विद्यार्थ्यांपासून नागरिकांपर्यंत चार गटांमध्ये निःशुल्क राज्यस्तरीय स्पर्धा, एकूण १ लाख रुपयांची बक्षिसे

Vijay chavan

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने दि यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक लि., यवतमाळ यांच्यावतीने सहकार महर्षी स्व. लक्ष्मणराव ईनामदार स्मृती राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पूर्णतः निःशुल्क असून विद्यार्थ्यांपासून सहकार क्षेत्रातील कर्मचारी व सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली आहे.

ही निबंध स्पर्धा चार गटांमध्ये घेण्यात येणार आहे.
गट क्रमांक १ (इयत्ता ८ वी ते १० वी) शालेय विद्यार्थ्यांसाठी – शॉपिंग मॉल आणि सहकारी तत्त्वावरील ग्राहक भांडार यातील फरक, माझे आवडते सहकार महर्षी आणि सहकाराचे महत्त्व असे विषय देण्यात आले आहेत.
गट क्रमांक २ (महाविद्यालयीन विद्यार्थी) – सहकार क्षेत्रात तरुणांचा सहभाग वाढविण्याची गरज, सहकारात नव्या तंत्रज्ञानाची गरज व विकसित भारत २०४७ आणि सहकार क्षेत्राची भूमिका हे विषय आहेत.
गट क्रमांक ३ (सहकार क्षेत्रातील कर्मचारी) – सहकारी बँकामधील अडचणी आणि उपाययोजना, भारतीय अर्थव्यवस्थेत सहकाराचे योगदान व स्व. लक्ष्मणराव ईनामदार यांचे सहकार क्षेत्रातील योगदान असे विषय देण्यात आले आहेत.
तर गट क्रमांक ४ (खुला गट) – ग्रामीण अर्थव्यवस्थेत सहकाराचे महत्त्व, सहकारातून राष्ट्राचा सर्वांगीण विकास व बिना संस्कार नही सहकार, बिना सहकार नही उद्धार हे विषय ठेवण्यात आले आहेत. स्पर्धकांनी आपल्या गटातील कोणत्याही एका विषयावर निबंध लिहायचा आहे.

या स्पर्धेत एकूण १ लाख रुपयांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली असून प्रत्येक गटासाठी ५ बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी ११,००० रुपये, द्वितीय ७,००० रुपये, तृतीय ४,००० रुपये, चतुर्थ २,००० रुपये आणि पाचव्या क्रमांकासाठी १,००० रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

निबंध मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा संस्कृत या पैकी कोणत्याही एका भाषेत स्वहस्ताक्षरात व सुवाच्य लिहिणे आवश्यक आहे. निबंधावर “स्व. लक्ष्मणराव ईनामदार स्मृती राज्यस्तरीय निबंध स्पर्धा”, गटाचे नाव, स्पर्धकाचे नाव व संपर्क क्रमांक स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक आहे.

निबंध सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२६ आहे. निबंध बंद पाकिटात दि यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक लि., मुख्य कार्यालय, एल.आय.सी. चौक, गार्डन रोड, यवतमाळ येथे किंवा बँकेच्या जवळच्या कोणत्याही शाखेत पाठवावेत, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.

या स्पर्धेबाबतच्या सविस्तर सूचना, नियम व अटी बँकेच्या अधिकृत वेबसाईट yavatmalurban.bank.in वर उपलब्ध आहेत.
SCROLL FOR NEXT