नवी दिल्ली : ग्राहकांचा विश्वास वाढवणे, स्पॅम कॉल्सवर नियंत्रण ठेवणे आणि व्हॉइस कॉलद्वारे होणाऱ्या आर्थिक फसवणुकीला आळा घालण्याच्या उद्देशाने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) द्वारे नियंत्रित सर्व संस्थांनी ग्राहकांना सेवा आणि व्यवहारासाठी केले जाणारे कॉल ‘1600’ मालिकेतील क्रमांकांवरूनच करावेत, असे निर्देश ट्रायने दिले आहेत. यासाठी 15 फेब्रुवारी 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
TRAI च्या म्हणण्यानुसार, ‘1600’ मालिका क्रमांकांचा अवलंब केल्याने नागरिकांना विमा कंपन्या व इतर नियंत्रित संस्थांकडून येणारे कायदेशीर आणि अधिकृत कॉल सहजपणे ओळखता येतील. त्यामुळे बँक, विमा किंवा वित्तीय संस्थांच्या नावाखाली होणारे दिशाभूल करणारे किंवा फसवे कॉल मोठ्या प्रमाणात कमी होतील.
TRAI ने स्पष्ट केले की 16 डिसेंबर 2025 रोजी हा निर्देश जारी करण्यात आला होता. त्यानुसार IRDAI-नियंत्रित संस्थांनी ठरलेल्या अंतिम मुदतीपर्यंत ‘1600’ मालिका क्रमांक स्वीकारणे बंधनकारक आहे. हा आदेश IRDAI शी सल्लामसलत करून जारी करण्यात आल्याचे ट्रायने सांगितले.
यापूर्वी TRAI ने RBI, SEBI आणि PFRDA द्वारे नियंत्रित संस्थांसाठीही अशाच स्वरूपाचे निर्देश जारी केले होते. आता विमा क्षेत्रालाही या नियमांच्या कक्षेत आणण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण BFSI (बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा) क्षेत्रात कॉल ओळखीसाठी एकसमान पद्धत लागू होणार आहे.
TRAI च्या नियामक उपक्रमाला प्रतिसाद देत, दूरसंचार विभागाने (DoT) ‘1600’ क्रमांकन मालिका बँकिंग, वित्तीय सेवा, विमा क्षेत्रातील संस्था तसेच सरकारी संस्थांना वाटप करण्यासाठी नियुक्त केली आहे. या मालिकेमुळे सेवा व व्यवहार कॉल्स इतर व्यावसायिक किंवा प्रचारात्मक कॉल्सपासून स्पष्टपणे वेगळे ओळखता येणार आहेत.
TRAI ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुमारे 570 संस्थांनी ‘1600’ मालिका क्रमांक स्वीकारले असून 3,000 हून अधिक क्रमांकांची सदस्यता घेतली आहे. ट्राय दूरसंचार सेवा प्रदाते आणि BFSI नियामकांच्या सहकार्याने या प्रक्रियेवर नियमितपणे लक्ष ठेवून आहे.
TRAI ने म्हटले आहे की अनेक संस्था अजूनही सेवा व व्यवहार कॉलसाठी सामान्य 10-अंकी मोबाईल क्रमांकांचा वापर करत आहेत. यामुळे विश्वासार्ह वित्तीय संस्थांच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचा धोका वाढतो. त्यामुळे सर्व संस्थांनी ठरलेल्या वेळेत ‘1600’ मालिकेवर स्थलांतर करणे अत्यावश्यक असल्याचे ट्रायने अधोरेखित केले आहे.
संयुक्त नियामक समिती (JCoR) च्या बैठकींमध्ये झालेल्या चर्चेनंतर TRAI ने IRDAI कडून अंमलबजावणीच्या वेळापत्रकाबाबत माहिती घेतली. त्या सल्लामसलतींच्या आधारेच अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले असल्याचे ट्रायने स्पष्ट केले.
TRAI च्या मते, ‘1600’ मालिकेचा संरचित आणि कालबद्ध अवलंब केल्यास ग्राहकांच्या सुरक्षेत लक्षणीय सुधारणा होईल. तसेच, व्हॉइस कॉलद्वारे होणाऱ्या तोतयागिरी-आधारित आर्थिक फसवणुकीवर प्रभावी नियंत्रण मिळेल.