आता फायनान्शियल फ्रॉड थांबणार; फसवणुकीला पायबंद ‘1600’ मालिकेतून!

अवलंबासाठी अंतिम मुदतीवर TRAI ठाम
Finanacial Fraud
आता फायनान्शियल फ्रॉड थांबणार; फसवणुकीला पायबंद ‘1600’ मालिकेतून!
Published on

फोनवरील संभाषणातून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीला आळा घालण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बँका आणि वित्तीय संस्थांनी ग्राहकांशी संपर्क साधताना ‘1600’ मालिकेतील अधिकृत क्रमांकांचा वापर अनिवार्य करावा, असे निर्देश देण्यात आले असून १ जानेवारी २०२६ ही यासाठी अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.

अलीकडच्या काळात फसवे कॉल करून लोकांना OTP, बँक तपशील किंवा आर्थिक माहिती उकळण्याच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर अधिकृत आणि फसवे कॉल्स यात स्पष्ट फरक पडावा, ग्राहकांना विश्वसनीयता मिळावी आणि डिजिटल फसवणूक कमी व्हावी, या उद्देशाने ‘1600’ मालिकेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

सर्व वित्तीय क्षेत्रासाठी अनिवार्य

या मालिकेचा अवलंब करण्यास सरकारी बँका, खासगी बँका, विदेशी बँका, बँकेतर वित्तीय संस्था (NBFCs), म्युच्युअल फंड, मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या, स्टॉक ब्रोकर, सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs) यांसह सर्व आर्थिक सेवा पुरवणाऱ्या संस्थांना अनिवार्य करण्यात आले आहे.
यासाठी ट्रायने RBI, SEBI आणि PFRDA या प्रमुख नियामकांशीही चर्चा केली असून सर्व वित्तीय संस्थांनी वेळेत नियमानुसार बदल करण्याचे निर्देश दिले आहेत.

विविध संस्थांसाठी स्वतंत्र अंतिम मुदती

सर्व बँकांनी १ जानेवारी २०२६ पर्यंत ‘1600’ मालिकेचा अवलंब पूर्ण करणे बंधनकारक आहे.
म्युच्युअल फंड कंपन्या, मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या आणि पेन्शन फंड व्यवस्थापकांनी १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत हा बदल पूर्ण करावा.
एनबीएफसी, सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि इतर लहान वित्तीय संस्थांसाठी १ मार्च २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
तर सर्व पात्र शेअर दलालांनी १५ मार्च २०२६ पर्यंत ‘1600’ मालिकेत सामील होणे अपेक्षित आहे.
विमा कंपन्यांसाठी अंतिम तारीख निश्चित करण्यासंबंधी IRDAI सोबतची चर्चा सुरू आहे.

485 संस्थांनी आधीच अवलंब केला

दूरसंचार विभागाच्या अहवालानुसार, आतापर्यंत ४८५ संस्थांनी ‘1600’ मालिका स्वीकारली असून त्यापैकी २८०० पेक्षा अधिक क्रमांक कार्यरत झाले आहेत. यामुळे वित्तीय क्षेत्रात एकसंध, विश्वसनीय आणि ओळखण्यास सोपे असे अधिकृत कॉन्टॅक्ट सिस्टम निर्माण होत आहे.

ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा

या उपक्रमामुळे—

  • फसवे कॉल्समुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता कमी होईल

  • अधिकृत कॉल ओळखणे सोपे होईल

  • डिजिटल व्यवहारांबद्दल ग्राहकांचा आत्मविश्वास वाढेल

  • फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये घट होईल

ट्रायचे मत आहे की 1600 मालिका ही देशभरातील लाखो ग्राहकांसाठी सुरक्षित आर्थिक व्यवहारांची नवी हमी ठरणार आहे.

Banco News
www.banco.news