मुंबई : देशातील कनिष्ठ मध्यमवर्ग हा सर्वाधिक आकांक्षावान वर्ग म्हणून उदयास येत असून, त्यांच्या कर्ज घेण्याच्या सवयींमध्ये लक्षणीय बदल होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. होम क्रेडिट इंडियाच्या ‘हाऊ इंडिया बॉरोज’ (How India Borrows – HIB) या वार्षिक पाहणीच्या सातव्या आवृत्तीत ही बाब समोर आली आहे. या पाहणीनुसार मुंबईतील कनिष्ठ मध्यमवर्गातील ४७ टक्के नागरिकांनी ऑनलाइन डिजिटल कर्ज पर्यायांना पसंती दर्शवली आहे.
देशाच्या लोकसंख्येच्या जवळपास दोन तृतीयांश हिस्सा असलेला हा वर्ग देशाच्या आर्थिक वृद्धीला चालना देणारा मूक चालक मानला जातो. आर्थिक गरजा, जीवनमान उंचावण्याच्या आकांक्षा आणि डिजिटल सुविधांचा वाढता स्वीकार यामुळे कर्जाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत असल्याचे या अहवालातून दिसून येते.
पाहणीमध्ये सहभागी झालेल्या कनिष्ठ मध्यमवर्गातील ३९ टक्के लोक इंटरनेट बँकिंगचा वापर करत असल्याचे आढळून आले आहे. यावरून डिजिटल कर्जप्रणाली आणि ऑनलाइन आर्थिक सेवांवरील विश्वास वाढत असल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे, हा वर्ग केवळ तातडीच्या गरजांसाठीच नव्हे तर दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठीही कर्जाचा वापर करत आहे.
पाहणीतील आकडेवारीनुसार,
३१ टक्के लोक घर खरेदीसाठी कर्ज घेण्यास इच्छुक आहेत,
तर २७ टक्के लोक व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विस्तारासाठी भांडवल उभारण्याच्या उद्देशाने कर्ज घेत आहेत.
याशिवाय जीवनमान सुधारणा, आर्थिक स्थैर्य आणि वैयक्तिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठीही कर्ज हा एक महत्त्वाचा पर्याय ठरत आहे.
हाऊ इंडिया बॉरोज ७.० या पाहणीमध्ये मुंबईतील कर्जदारांचे एक वेगळेच चित्र समोर आले आहे. मुंबईतील कनिष्ठ मध्यमवर्गीय नागरिक हे महत्त्वाकांक्षा आणि आर्थिक शिस्त यांचा समतोल साधताना दिसतात.
मुंबईत इंटरनेट बँकिंगचा वापर ३९ टक्के असून, हे प्रमाण चेन्नई आणि दिल्ली-एनसीआरसारख्या शहरांपेक्षा कमी असले तरी या ३९ टक्क्यांपैकी ५१ टक्के वापरकर्ते ‘जेन झी’ पिढीतील आहेत. यावरून तरुण पिढी डिजिटल फायनान्सकडे अधिक झुकत असल्याचे स्पष्ट होते.
कर्ज घेण्याचा निर्णय घेताना मुंबईकर सावध भूमिका घेत असल्याचेही या पाहणीत दिसून आले आहे.
४२ टक्के प्रतिसादकर्ते ईएमआय परवडेल की नाही याचा विचार करतात,
तर ३७ टक्के लोक कर्ज घेण्यापूर्वी कर्जदात्याची विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा तपासतात.
यातून कर्ज घेताना केवळ सुविधा नव्हे, तर विश्वास आणि पारदर्शकतेलाही तेवढेच महत्त्व दिले जात असल्याचे स्पष्ट होते.
मुंबईतील ४७ टक्के लोक ऑनलाइन लोन माध्यमांना प्राधान्य देत आहेत, कारण त्यात वेग, सोय आणि पारदर्शकता अधिक असल्याचे त्यांचे मत आहे. मात्र, याचबरोबर ४० टक्के लोक कर्ज शक्य तितक्या लवकर फेडण्याला महत्त्व देतात. हे शिस्तबद्ध आर्थिक वर्तनाचे स्पष्ट निदर्शक मानले जात आहे.
कर्ज घेण्याचा कल वाढत असला तरी मुंबईकर पूर्णपणे बेफिकीर नाहीत. पाहणीनुसार ३४ टक्के प्रतिसादकर्ते संभाव्य कर्जसापळ्यांबाबत सतर्क असल्याचे सांगतात. त्यामुळेच कर्ज घेण्याआधी अटी, व्याजदर आणि परतफेडीची क्षमता याचा गांभीर्याने विचार केला जात आहे.
हाऊ इंडिया बॉरोज ७.० पाहणीमधून मुंबईतील कनिष्ठ मध्यमवर्गाचा एक संतुलित चेहरा समोर येतो. डिजिटल कर्जाकडे झुकणारी मानसिकता, आर्थिक उद्दिष्टांवर लक्ष आणि परतफेडीतील शिस्त यामुळे हा वर्ग भविष्यात देशाच्या आर्थिक व्यवस्थेत अधिक महत्त्वाची भूमिका बजावेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.