धाराशिव येथील धाराशिव, लातूर, बीड, सोलापूर, अहिल्यानगर, व कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेली मराठवाड्यातील अग्रणी सहकारी बँक असलेल्या जनता सहकारी बँक लि. धाराशिव (पूर्वीची उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि. उस्मानाबाद) बँकेमध्ये नुकताच श्रीसंत ज्ञानेश्वर मंदिर सभागृह धाराशिव येथे कर्मचारी गुणगौरव सोहळा व मोबाईल बँकिंग ॲपचा शुभारंभ सोहळा संपन्न झाला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष श्री. वसंतराव नागदे हे होते.
अध्यक्ष श्री. वसंतराव नागदे, मोटीव्हेशनल स्पीकर श्री. जयश मार्तंडराव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व लक्ष्मी पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके यांनी प्रस्तावना करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन दिला.
सकाळच्या सत्रामध्ये श्री. जयश मार्तंडराव देशमुख, (नागपूर) यांचे मोटीव्हेशनल आणि स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर मार्गदर्शन झाले, त्यांनी कर्मचाऱ्यांनी मोटीव्हेशनवर व कामामुळे येणारा स्ट्रेस कसा कमी करायचा जेणेकरुन ते तणावमुक्त काम करतील. याबद्दल मार्गदर्शन केले.
त्यानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्व संचालक मंडळाचे स्वागत करण्यात आले. तसेच बँकेने अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करुन तयार केलेल्या बँकेच्या मोबाईल बँकिंग ॲपचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी संचालक अशिष मोदाणी म्हणाले की, "बँकेच्या ग्राहक, सभासद, खातेदार यांना , NEFT, इंटर बँक ट्रान्सफर, या सारख्या विविध सेवा ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. ग्राहकांच्या सोईसाठी बँक नेहमीच अद्ययावत तंत्रज्ञानाला प्राधान्य देते. हे मोबाईल ॲप त्याच दिशेने टाकलेले एक पुढचे पाऊल आहे. तसेच बँक लवकरच UPI, RTGS, IMPS व इंटरनेट बँकिंग सेवा कार्यान्वित करणार आहे."
त्यानंतर बँकेच्या सेवानिवृत्त झालेल्या ४२ कर्मचाऱ्यांना संचालक मंडळाच्या हस्ते सेवा पारितोषक देण्यात आले. तसेच त्यांना बँकच्या वतीने बॅग, स्मृतिचिन्ह भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर सन २०२४ - २०२५ या आर्थिक वर्षातील बँकेचा नफा व व्यवसाय वाढीसाठी केलेल्या कामकाजाचा गुणगौरव करून बँकेच्या विविध शाखांतील अधिकारी, कर्मचारी, सेवक, व पिग्मी एजंट यांना बॅग, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमामध्ये बँकेचे अध्यक्ष श्री. वसंतराव नागदे यांनी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. भालचंद्र चौधरी व अतुल बोधले यांनी केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके यांनी सर्वाचे आभार मानले. कार्यक्रमास बँकेचे उपाध्यक्ष श्री. वैजीनाथ शिंदे, ज्येष्ठ संचालक श्री. विश्वास अप्पा शिंदे, श्री. तानाजी चव्हाण, श्री. सुभाष धनुरे, श्री. प्रदिप जाधव-पाटील, श्री.नंदकुमार नागदे, श्री. हरी सूर्यवंशी, डॉ. श्री. जयसिंग देशमुख, माजी संचालक श्री. चंद्रकांत बागल, बँकेतील सर्व अधिकारी, कर्मचारी व पिग्मी एजंट मोठ्या संख्येने उपस्थित होते.