
धाराशिव : मराठवाड्यातील बहु-राज्यीय नागरी सहकारी बँक म्हणून ओळखली जाणाऱ्या जनता सहकारी बँकेची ८१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली. यावेळी बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे यांनी, सभासद व कर्जदारांच्या सहकार्यामुळे यंदाही निव्वळ एनपीए शून्य टक्के राखण्यात आपली बँक यशस्वी झालेली आहे. तसेच चालू आर्थिक वर्षात बँकेला तब्बल ४५.०७ कोटींचा निव्वळ नफा झाल्याची माहिती दिली.
सुरुवातीला उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत करुन प्रथम लक्ष्मीपूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर बँकेचे ज्येष्ठ संचालक श्री. विश्वास शिंदे यांनी अहवाल वर्षात बँकेचे संचालक कै. सुभाषराव व. गोविंदपूरकर, सभासद, ग्राहक, कर्मचारी, हितचिंतक त्याचप्रमाणे राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय कीर्तीच्या थोर विभूती, शहीद जवान यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून बँकेच्या प्रगतीबाबत व बँकेकडून ग्राहकांकरीता देण्यात येणा-या विविध सेवा सुविधा बाबत आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर बँकेचे अध्यक्ष श्री. वसंत संभाजीराव नागदे यांनी साल सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात संचालक मंडळाने केलेल्या बँकेच्या अर्थिक प्रगतीचा व कामगिरीचा आढावा सादर केला, त्यामध्ये सर्वप्रथम अहवाल वाचन व ताळेबंद व नफातोटा पत्रक बाबत तपशीलवार माहिती सादर केली.
बँकेची आर्थिक स्थिती:
* भागभांडवल : ₹७९.६८ कोटी
* ठेवी : ₹१८७९.६६ कोटी
* कर्ज वितरण : ₹१२७०.११ कोटी
* गुंतवणूक : ₹१०९६.६३ कोटी
* एकूण व्यवसाय : ₹३१४६.७७ कोटी
* सभासद : ७८,२७९
* ठेवीदार : ४,२१,६६५
* कर्जदार : १२,६८९
यावेळी उपाध्यक्ष विश्वास शिंदे, व्यवस्थापन मंडळ प्रमुख तानाजी चव्हाण, प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, आशिष मोदाणी, सीए. दीपक भातभागे, विनोद साळुंके, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके तसेच आजी-माजी कर्मचारी व सभासद मोठ्या संख्यने उपस्थित होते. बाजारातील अस्थिरता, व्याजदरातील चढ-उतार आणि महागाईच्या कठीण परिस्थितीतही बँकेने सातत्याने वाढ साधली असल्याचे नागदे यांनी नमूद करून यंदा बँकेच्या सर्व सभासदांना ८% लाभांश देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याचे सांगितले.
बँकेकडून ग्राहक सेवेत आधुनिक तंत्रज्ञान :
१४ शाखांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या बँकेने ग्राहकांसाठी विविध डिजिटल सेवा सुरू केल्या आहेत. यात स्वाईप मशीन, पीओएस, एटीएम, रूपे डेबिट कार्ड, आरटीजीएस, एनईएफटी, एसएमएस बँकिंग, ए.बी.बी., सीटीएस क्लिअरिंग, मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग यांचा समावेश आहे.
बँकेच्या पथदर्शी धोरणामुळे व्यवसायात सातत्याने वाढ होत असून मार्च २०२५ अखेर बँकेचा ३१४७ कोटींपेक्षा जास्त व्यवसाय झाला आहे.