कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोहनलालजी भंडारी (अध्यक्ष, नामको हॉस्पिटल व संचालक, नामको बँक) होते. यावेळी आशिषजी नहार (अध्यक्ष, 'निमा', नाशिक), विश्वासजी ठाकूर (माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक असोसिएशन व चेअरमन, विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक), अजयजी ब्रह्मेचा (अध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन, मुंबई) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हस्ती बँकेने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय आर्थिक प्रगती साधली आहे. सध्या बँकेकडे ₹१,३२५ कोटींपेक्षा अधिक ठेवी, ₹८०० कोटींपेक्षा अधिक कर्जवाटप, ₹२२८.५२ कोटी स्वनिधी आणि ₹२४.७७ कोटी निव्वळ नफा आहे. विशेष म्हणजे बँकेने सलग १४ वर्षे शून्य टक्के नेट एनपीए राखण्याचा विक्रम केला असून तिला ३७ राष्ट्रीय व २६ राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार सीमाताई हिरे यांनी सहकारी बँका या केवळ आर्थिक संस्था नसून समाजाच्या विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. शेतकरी, महिला बचत गट, लघुउद्योजक, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक बळ देण्यात सहकारी बँकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. नाशिक जिल्ह्यात सहकार क्षेत्रावर नागरिकांचा मोठा विश्वास असून हस्ती बँकेलाही त्याचप्रमाणे उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मान्यवरांनी आपल्या भाषणात खासगी आणि व्यावसायिक बँकांच्या तुलनेत सहकारी बँकांचे महत्त्व अधोरेखित केले. सहकारी बँकांमध्ये ठेवलेल्या ठेवी व कर्ज व्यवहारातून होणारा नफा पुन्हा सभासद आणि समाजाच्या विकासासाठीच वापरला जात असल्याने नागरिकांनी सहकारी बँकांशी आपले व्यवहार वाढवावेत, असे आवाहन करण्यात आले.
हस्ती बँक ग्राहकांसाठी मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, RTGS, NEFT, IMPS, QR कोड व्यवहार, ऑनलाइन कर भरणा, एसएमएस बँकिंग यांसह अत्याधुनिक डिजिटल सुविधा उपलब्ध करून देत आहे. बँकेचा स्वतःचा IFSC कोड असल्याने निधी हस्तांतरण अधिक जलद आणि सुलभ होत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
"प्रतिज्ञा आमची... प्रगती तुमची" या ब्रीदवाक्याला साजेसा सेवा भाव जपत हस्ती बँकेने नाशिककरांच्या सेवेत प्रवेश केला आहे. नाशिकमधील व्यापारी, उद्योजक, शेतकरी, महिला बचत गट आणि सर्वसामान्य ग्राहकांना आधुनिक, विश्वासार्ह व गुणवत्तापूर्ण बँकिंग सेवा देण्याचा संकल्प बँक व्यवस्थापनाने व्यक्त केला. नवीन शाखेमुळे सिडको परिसरातील ग्राहकांना सहकारी बँकिंगचा आणखी एक सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे.