
दोंडाईचा दि हस्ती को-ऑप बँकेला दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन मुंबईतर्फे नाशिक येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात सन २०२४-२५ मधील 'सर्वोत्कृष्ट बँक' पुरस्कारात १००१ ते २५०० कोटी ठेवीपर्यंत असलेल्या बँक गटातून द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे नॅशनल अम्ब्रेला ऑर्गनायझेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह बँक्स अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता, दि महाराष्ट्र अर्बन को ऑप. बँक्स फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, उपाध्यक्षा वैशालीताई आवाडे,आ.प्रवीण दरेकर,मुख्य कार्यकारी / सचिव प्रसाद पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यावेळी हस्ती को-ऑप.बँकेचे चेअरमन कैलास जैन आणि अधिकारी अमर छाबडिया यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
हस्ती को-ऑप. बँक ५५ वर्षांपासून ग्राहक सेवेत कार्यरत असून बँकेने ठेवींचा ११५० कोटींचा टप्पा नुकताच पार केला आहे. बँकेचा एकूण व्यवसाय १९०० कोटींच्या वर असून बँकेने गेल्या आर्थिक वर्षात २३.१० कोटींचा निव्वळ नफा मिळविलेला आहे. बँकेच्या २२ शाखा कार्यरत असून, सर्व प्रकारच्या डिजिटल पेमेंट सेवा बँक ग्राहकांना यशस्वीरित्या देत आहे. बँकेने सुरूवातीपासून सभासदांना डिव्हिडंटचे वाटप केले आहे.
गेल्या ३२ वर्षापासून सातत्याने १५ टक्के दराने डिव्हिडंट आदा करण्यात येत असून, बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त २५ टक्के दराने डिव्हिडंट आदा करण्यात आला आहे. बँकेचे संस्थापक स्व. हस्तीमल जैन, मार्गदर्शक स्व. शांतीलाल जैन व आधारस्तंभ स्व. कांतीलाल जैन यांनी घालून दिलेले नियम व पद्धतींचे पालन करीत बँक सातत्याने प्रगतीपथावर आहे.
बँकेचे व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष मदन जैन तथा सर्व संचालक मंडळ व व्यवस्थापन मंडळ तसेच सीईओ सतीश जैन, बँकिंग तज्ञ प्रकाश कुचेरिया यांच्या मार्गदर्शनखाली बँक सर्व क्षेत्रात प्रगती साधत आहे, असे प्रतिपादन बँकेचे प्रेसिडेंट कैलास जैन यांनी यावेळी केले. बँकेचे खातेदार व ग्राहक यांच्या सहकार्याने तथा बँकेच्या वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्या सांघिक कामामुळे बँकेने हा टप्पा गाठला आहे, असेही ते म्हणाले. आजपर्यंत बँकेस राज्य व राष्ट्रीय पातळीवरील ५६ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.