

दोंडाईचा (धुळे): सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या 'दि हस्ती को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड'ने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये आपली दैदीप्यमान परंपरा कायम राखली आहे. बँकेने सरत्या आर्थिक वर्षात एकूण व्यवसायाचा २ हजार ८६ कोटी रुपयांचा टप्पा यशस्वीपणे ओलांडला असून, विशेष म्हणजे गेल्या १३ वर्षांपासून बँकेने 'शून्य टक्के' निव्वळ एनपीए (Net NPA 0%) राखण्याचा विक्रम कायम ठेवला आहे.
बँकेने प्रसिद्ध केलेल्या ३१ मार्च २०२६ अखेरच्या आर्थिक आकडेवारीनुसार (बिगर लेखापरीक्षित), बँकेच्या सर्वच क्षेत्रांत लक्षणीय वाढ दिसून येत आहे.
व्यवसायात मोठी वाढ: बँकेचा एकूण व्यवसाय मागील वर्षी १८९९ कोटी होता, तो आता ९.८४ टक्क्यांनी वाढून २०८६.६१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
ठेवी आणि कर्जपुरवठा: बँकेच्या ठेवींमध्ये ११.६२ टक्क्यांची वाढ होऊन त्या १२८७.७८ कोटी झाल्या आहेत, तर कर्जपुरवठा (Advances) ७.०९ टक्क्यांनी वाढून ७९८.८३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
नफ्यात वाढ: बँकेने यंदा २४.२६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निव्वळ नफ्यात ५.०५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
भांडवल आणि निधी: बँकेचे भागभांडवल ९.३२ कोटी असून राखीव निधीमध्ये १३.१३ टक्क्यांची मोठी वाढ होऊन तो २२०.५५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
बँकेच्या यशाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे थकीत कर्जावरील नियंत्रण. बँकेचा ढोबळ एनपीए (GNPA) २.९७% वरून कमी होऊन २.२०% वर आला आहे. अत्यंत शिस्तबद्ध नियोजनामुळे बँकेने सलग १३ व्या वर्षी आपला निव्वळ एनपीए ०.००% राखून बँकिंग क्षेत्रात आपला विश्वास कायम ठेवला आहे.
बँकेने आपल्या ५५ व्या वर्षात पदार्पण केले असून, "प्रतिज्ञा आमची... प्रगती तुमची...!" या ब्रीदवाक्याप्रमाणे ग्राहक आणि सभासदांच्या प्रगतीसाठी बँक कटिबद्ध असल्याचे या आर्थिक निकालावरून स्पष्ट होते.