सोने तारण कर्ज 
Co-op Banks

सोने तारण कर्जांत मोठी वाढ : लोकसभेत चर्चा

१ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आरबीआयचे नवे नियम

Pratap Patil

नवी दिल्ली: देशात सोने तारण कर्जाचा आकडा १२ लाख कोटींवर पोहोचला असून, हा एक नवा विक्रम आहे. मात्र, बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) यांनी दिलेल्या सोन्यावरील कर्जातील बुडीत कर्जेसुद्धा (एनपीए) विक्रमी पातळीवर पोहोचली असल्याची चिंताजनक बाबही सामोरी आलेली आहे.

कर्ज आणि एनपीए वाढले असले तरी, ७५% एलटीव्ही (कर्ज ते मूल्य) गुणोत्तर कर्जाच्या संपूर्ण कालावधीत राखणे आवश्यक आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे. याबाबत लोकसभेत राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. आता जुलै आणि ऑगस्ट २०२५ मध्ये लोकसभेत झालेल्या चर्चेनुसार भारतातील सोने तारण कर्जाचे नियम बदलण्यात आले असून वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) नवे दिशा-निर्देश १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहेत.

सोने तारण कर्जाबाबत लोकसभेत मांडलेले मुख्य मुद्दे:

* कर्जाच्या रकमेत वाढ : वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी २८ जुलै २०२५ रोजी सांगितले की, मे २०२४ ते मे २०२५ दरम्यान सोन्यावरील कर्जाचे मूल्य ₹१.१६ लाख कोटींवरून ₹२.५१ लाख कोटींवर पोहोचले आहे. म्हणजेच यामध्ये तब्बल ११५.२५% वाढ झालेली आहे.

* लहान कर्जदारांना दिलासा : छोटे आणि सीमांत कर्जदार सहजतेने सोने तारण कर्ज घेऊ शकतील, यासाठी वित्त मंत्रालयाने RBI ला सूचना दिलेल्या होत्या. त्यानंतर, छोटे कर्ज सोपे करण्यासाठी RBI ने नवे नियम आणले आहेत.

कर्ज ते मूल्य गुणोत्तर (LTV) अनुपातात बदल:

* ₹२.५ लाखांपर्यंतच्या सोने तारण कर्जासाठी LTV (कर्ज ते मूल्य गुणोत्तर )७५% वरून वाढवून ८५% करण्यात आला.

* ₹२.५ लाख ते ₹५ लाख पर्यंतच्या कर्जासाठी LTV ८०% असेल.

* ₹५ लाखांपेक्षा जास्त कर्जासाठी पूर्वीप्रमाणे ७५% मर्यादा राहील.

* मुदतपुर्तीवेळी पूर्ण परतफेड होणारे कर्ज (बुलेट रीपेमेंट लोन) नियम :

* यापूर्वी सहकारी व ग्रामीण बँकांमध्ये मुदतपुर्तीवेळी पूर्ण परतफेड होणाऱ्या कर्जाची मर्यादा ₹४ लाख होती, ती आता रद्द करण्यात आली आहे.

* अशा कर्जाचे फक्त थकलेले व्याज भरल्यानंतरच पुन्हा नूतनीकरण (Renew) करता येईल.

पारदर्शकता व जबाबदारी:

* कर्जदात्यांनी तारण सोने-चांदीवर स्वतःची मालकी स्पष्ट करणे बंधनकारक असेल.

* तारण ठेवलेले सोने-चांदी पुन्हा कुठेही गहाण ठेवता येणार नाही.

* कर्जदारांशी स्थानिक भाषेत संवाद साधावा, जेणेकरून नियमांची समज नीटपणे करून देता येईल.

कर्जदारांच्या सुरक्षेसाठीचे उपाय:

* नुकसान किंवा हानी झाल्यास कर्जदाराला पूर्ण नुकसानभरपाई द्यावी लागेल.

* कर्ज फेडल्यानंतर तारण ठेवलेले सोने कर्जदाराला त्वरित परत द्यावे लागेल. विलंब झाल्यास कर्जदाराला ₹५,००० प्रतिदिन इतकी रक्कम नुकसानभरपाई म्हणून द्यावी लागेल.

SCROLL FOR NEXT