
मुंबई – बँकेत भरलेला चेक वटण्यासाठी आता ग्राहकांना दोन-तीन दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) चेक क्लिअरिंगची नवी पद्धत जाहीर केली असून ती ४ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार आहे. या बदलामुळे बँकेत दिलेले चेक काही तासांतच वटवले जातील, ज्यामुळे आर्थिक व्यवहार अधिक जलद आणि सुलभ होतील..
दोन टप्प्यांत अंमलबजावणी
ही नवी पद्धत दोन टप्प्यांत लागू करण्यात येईल.
पहिला टप्पा: ४ ऑक्टोबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ दरम्यान सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत बँकेत स्वीकारलेले चेक लगेच स्कॅन करून क्लिअरिंग हाऊसला पाठवावे लागतील. संबंधित दुसऱ्या बँकेने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चेक मंजूर किंवा नामंजूर असल्याचे कळवावे लागेल. वेळेत उत्तर न दिल्यास चेक आपोआप मंजूर मानला जाईल.
दुसरा टप्पा: ३ जानेवारी २०२६ पासून बँकांना चेक मिळाल्यानंतर कमाल तीन तासांच्या आत मंजुरी द्यावी लागेल. उदाहरणार्थ, सकाळी १० ते ११ दरम्यान मिळालेल्या चेकसाठी दुपारी २ वाजेपर्यंत उत्तर देणे बंधनकारक असेल. वेळेत मंजुरी न दिल्यास चेक मंजूर मानून सेटलमेंटमध्ये धरला जाईल.
ग्राहकांना त्वरित रक्कम
सेटलमेंट झाल्यानंतर बँकेने ग्राहकाच्या खात्यात रक्कम त्वरित, पण कमाल एका तासात जमा करणे अनिवार्य असेल. यामुळे व्यवहार अडून राहणार नाहीत आणि पेमेंट्सच्या विलंबाचा त्रास संपणार आहे.
RBIच्या या निर्णयामुळे बँकिंग व्यवहारांची गती वाढेल, ग्राहकांचा वेळ वाचेल आणि चेक वटवणीतील पारदर्शकता व कार्यक्षमता सुधारेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.