कोल्हापूर: ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत सायबर भामट्यांनी राजारामपुरी परिसरातील निवृत्त प्राध्यापकाकडून तब्बल ७८ लाख ९० हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत १६ लाख ४५ हजार रुपयांची रक्कम गोठवली असून, हे आंतरराज्य स्वरूपाचे सायबर फसवणूक रॅकेट असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०२५ या कालावधीत ही फसवणूक घडली. राजारामपुरी येथील तेराव्या गल्लीत वास्तव्यास असलेल्या निवृत्त प्राध्यापक आणि त्यांच्या पत्नीशी संपर्क साधून भामट्यांनी स्वतःला मुंबईच्या कुलाबा पोलिस ठाण्यातील अधिकारी असल्याचे भासवले.
प्रारंभी भामट्यांनी, “तुमचे मोबाईल सिमकार्ड काही तासांत बंद होणार आहे,” असा दावा केला. त्यानंतर व्हॉट्सअॅप कॉलद्वारे पोलिस ठाण्याचा सेट दाखवून, ‘उमेश मच्छिन्द्र’ या नावाने वरिष्ठ अधिकारी बोलत असल्याचा बनाव केला.
भामट्यांनी प्राध्यापकांना सांगितले की, नरेश गोयल मनी लॉन्डरिंग व गुंतवणूक प्रकरणातील ५३८ कोटींच्या फसवणुकीत त्यांच्या आधार कार्डचा वापर झाला आहे. त्यामुळे त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ होऊ शकते, अशी भीती निर्माण करण्यात आली. नरेश गोयलचे फोटो पाठवून तसेच व्हॉट्सअॅप आणि व्हिडीओ कॉलवर दिवसभर दाम्पत्याला गुंतवून ठेवत मानसिक दबाव टाकण्यात आला.
सायबर भामट्यांनी न्यायालयाचा सेट दाखवून खटल्याची सुनावणी सुरू असल्याचा बनाव केला. प्राध्यापक, त्यांची पत्नी तसेच जवळच्या नातेवाइकांची माहिती घेत आरटीजीएस आणि नेट बँकिंगद्वारे विविध खात्यांत पैसे पाठवण्यास त्यांना भाग पाडण्यात आले. अशा प्रकारे ७८.९० लाख रुपयांची रक्कम भामट्यांनी उकळली.
दरम्यान, बँक खात्यातील रक्कम संपल्यानंतर प्राध्यापकांनी सहकारी मित्रांकडे मोठ्या रकमेची उसनवारी मागितली. यामुळे मित्रांना संशय आला आणि चौकशी केल्यानंतर हा सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
फिर्याद दाखल होताच राजारामपुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांनी तपासाची चक्रे गतिमान केली. विविध बँक खात्यांचा मागोवा घेत १६ लाख ४५ हजार रुपयांची रक्कम गोठवण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित रकमेचा शोध घेण्यासाठी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात शहरातील किमान पाच निवृत्त अधिकारी व प्राध्यापकांना अशाच पद्धतीने कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,
कोणताही ‘डिजिटल अरेस्ट’ असा प्रकार कायद्यात नाही.
पोलिस किंवा सरकारी यंत्रणा कधीही फोन, व्हॉट्सअॅप किंवा व्हिडीओ कॉलवरून पैसे मागत नाहीत.
संशयास्पद कॉल आल्यास तत्काळ सायबर हेल्पलाईन १९३० किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा.
या प्रकरणातील मुख्य आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असून, लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.