बँक लॉकर चावी हरवली तर काय करावे?  
Arth Warta

बँक लॉकरची चावी हरवली? काळजी नको, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया

लॉकर उघडण्यासाठी आता काय करावे लागेल? वाचा रिझर्व्ह बँकेचे नियम आणि खर्चाची माहिती...

Prachi Tadakhe

मुंबई: आपल्या आयुष्याची पुंजी, सोन्या-चांदीचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे आपण विश्वासाने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतो. मात्र, जर चुकून या लॉकरची चावी हरवली, तर मोठी पंचाईत होऊ शकते. बँकेकडे दुसरी चावी असते का? लॉकर तोडावा लागेल का? आणि याचा खर्च किती येईल? असे प्रश्न समोर आले की ग्राहक गोंधळून जातात. मात्र, नियमांची योग्य माहिती असल्यास ही प्रक्रिया सोपी होऊ शकते.

बँकेच्या लॉकरला दोन चाव्या असतात. एक चावी ग्राहकाकडे असते, तर दुसरी बँकेच्या मॅनेजरकडे. विशेष म्हणजे, जोपर्यंत या दोन्ही चाव्या एकत्र लावल्या जात नाहीत, तोपर्यंत लॉकर उघडत नाही. ग्राहकाच्या चावीची कोणतीही 'डुप्लिकेट' चावी बँकेकडे नसते, त्यामुळे ती जपून ठेवणे अत्यंत गरजेचे असते.

चावी हरवल्यास काय करावे?

१. लेखी तक्रार: चावी हरवल्याचे समजताच तातडीने संबंधित बँक शाखेत जाऊन लेखी अर्ज द्यावा. यात लॉकर क्रमांक आणि शाखेचा तपशील असणे आवश्यक आहे.

२. पोलीस तक्रार (FIR): चावी चोरीला गेली असल्यास किंवा सापडत नसल्यास पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) नोंदवावा लागतो. या तक्रारीची प्रत बँकेत अर्जासोबत जोडावी लागते.

३. हमीपत्र: जर हरवलेली चावी भविष्यात सापडली, तर ती बँकेकडे जमा करेन, असे हमीपत्र (Indemnity Bond) ग्राहकाला लिहून द्यावे लागते.

४. ओळखपत्र: प्रक्रियेसाठी पॅन कार्ड किंवा [Aadhaar Redacted] ची प्रत ओळख म्हणून सादर करावी लागते.

लॉकर कसा उघडला जातो?

चावी नसल्यास लॉकर तोडणे (Break Open) हाच एकमेव पर्याय उरतो. ही प्रक्रिया बँकेचे अधिकृत तंत्रज्ञ, बँक अधिकारी आणि स्वतः ग्राहक यांच्या उपस्थितीत पार पडते. लॉकर तोडताना शेजारील इतर लॉकरचे नुकसान होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाते.

खर्च कोणाला सोसावा लागतो?

लॉकर तोडण्याचा खर्च, तंत्रज्ञाची फी आणि नवीन लॉकर/चावी मिळवण्याचा खर्च हा पूर्णपणे ग्राहकालाच करावा लागतो. हा खर्च लॉकरचा आकार आणि बँकेच्या नियमांनुसार वेगवेगळा असू शकतो. बँक लॉकर करार (Agreement) करतानाच याची स्पष्ट कल्पना ग्राहकाला दिलेली असते.

बँकेला लॉकर तोडण्याचा अधिकार कधी असतो?

रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, काही विशिष्ट परिस्थितीत बँक लॉकर उघडू शकते:

  • जर ग्राहकाने सलग ३ वर्षे लॉकरचे भाडे भरले नसेल.

  • लॉकरमध्ये बेकायदेशीर वस्तू असल्याची शंका आल्यास.

  • लॉकर धारकाचा मृत्यू झाला असल्यास आणि कोणताही वारस (Nominee) नसल्यास. मात्र, अशा वेळी बँकेला रीतसर नोटीस प्रसिद्ध करावी लागते.

तक्रार कुठे करावी?

जर सर्व कागदपत्रे देऊनही बँक सहकार्य करत नसेल, तर ग्राहक 'बँकिंग ओम्बुड्समॅन' (Banking Ombudsman) किंवा ग्राहक न्यायालयात धाव घेऊ शकतात.

SCROLL FOR NEXT