Arth Warta

वर्षभरात बँकेत किती रोख जमा करू शकता? जाणून घ्या बँकेचा नियम

बचत खात्यातील एका चुकीमुळे बसू शकतो दंडाचा फटका; पॅन कार्ड आणि २ लाखांच्या मर्यादेबाबत काय सांगतो कायदा?

Prachi Tadakhe

मुंबई: बँकेत बचत खाते असणे आणि त्यात पैसे जमा करणे ही प्रत्येकासाठी अत्यंत सामान्य गोष्ट आहे. कोणी आपल्या कमाईतील बचत खात्यात ठेवतो, तर कोणी मुदत ठेव (FD) किंवा विविध सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करतो. मात्र, आपल्या स्वतःच्याच बँक खात्यात आपण एका वर्षात किती रोख रक्कम जमा करू शकतो? आणि एका मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास काय नियम लागू होतात? याबद्दल बहुतांश नागरिकांमध्ये अजूनही स्पष्टता नाही.

आयकर कायद्यानुसार बँक खात्यात पैसे जमा करण्यावर कोणतीही कायदेशीर बंदी किंवा विशिष्ट कमाल मर्यादा नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात रोख व्यवहार झाल्यास बँक आणि आयकर विभाग (Income Tax Department) त्यावर बारीक लक्ष ठेवतात. करचोरी, बेहिशोबी मालमत्ता आणि पैशांचा गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारने काही महत्त्वाचे नियम आखून दिले आहेत.

सध्याच्या नियमांनुसार, एका आर्थिक वर्षात (१ एप्रिल ते ३१ मार्च) एखाद्या व्यक्तीने आपल्या एका किंवा एकापेक्षा जास्त बचत खात्यांमध्ये मिळून ₹१० लाख किंवा त्याहून अधिक रोख रक्कम जमा केल्यास, बँकांना या व्यवहाराची माहिती थेट आयकर विभागाला देणे बंधनकारक असते.

  • एकत्रित बेरीज: ही १० लाखांची मर्यादा एकाच वेळी भरलेल्या रकमेवर नसून, वर्षभरात टप्प्याटप्प्याने जमा केलेल्या सर्व रोख ठेवींची बेरीज करून मोजली जाते.

  • नोटीस येते का?: खात्यात १० लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा झाली म्हणजेच लगेच टॅक्स नोटीस येईल असे नाही. परंतु, या रकमेचा स्रोत (Source of Income) काय आहे, हे सिद्ध करण्यासाठी विभाग स्पष्टीकरण किंवा कागदपत्रे मागू शकतो.

दिवसाला ₹५० हजार आणि ₹२ लाखांचे कडक नियम

  • पॅन कार्ड अनिवार्य: जर तुम्ही बँकेत एकाच दिवसात ₹५०,००० पेक्षा जास्त रोख रक्कम जमा करत असाल, तर पॅन (PAN Card) देणे बंधनकारक आहे. पॅन कार्ड नसल्यास नियमांनुसार 'फॉर्म ६०' (Form 60) भरावा लागतो.

  • २ लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहारांवर बंदी: आयकर कायद्याच्या कलम २६९ST (Section 269ST) नुसार, कोणत्याही एका व्यक्तीकडून एका दिवसात ₹२ लाख किंवा त्याहून अधिक रोख रक्कम स्वीकारण्यास पूर्णपणे बंदी आहे. व्यवहार वेगवेगळ्या भागात विभागून ही मर्यादा टाळण्याचा प्रयत्न केल्यास, जितकी रोख रक्कम स्वीकारली आहे तितकाच (१०० टक्के) दंड ठोठावला जाऊ शकतो.

जमा रक्कमेवर कर कधी लागतो?

बँक खात्यात पैसे जमा करणे हा स्वतःहून करपात्र व्यवहार नाही. परंतु जमा केलेली रक्कम ही तुमच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतातून (उदा. पगार, व्यवसाय, शेती, भाड्याचे उत्पन्न किंवा शेअर्समधील नफा) आलेली असावी.

आयकर विवरणपत्र (ITR) भरताना या उत्पन्नाची माहिती दिली असल्यास कोणतीही अडचण येत नाही. मात्र, जर जमा केलेल्या रकमेचा योग्य हिशोब किंवा स्रोत दाखवता आला नाही, तर त्या रकमेला 'बेहिशोबी उत्पन्न' मानून त्यावर मोठा कर आणि दंड आकारला जाऊ शकतो.

खातेदारांनी कोणती काळजी घ्यावी?

१. कागदपत्रे सुरक्षित ठेवा: मोठ्या रोख व्यवहारांशी संबंधित पगाराच्या पावत्या, व्यवसायाची बिले, मालमत्ता विक्री किंवा भाड्याची कागदपत्रे सुरक्षित ठेवावीत.

२. बँक स्टेटमेंट तपासा: संपूर्ण आर्थिक वर्षात खात्यात एकूण किती रोख जमा झाली आहे, याचे नियमित निरीक्षण करावे.

३. डिजिटल व्यवहारांना प्राधान्य द्या: शक्यतो रोख व्यवहारांऐवजी UPI, NEFT, RTGS किंवा चेकद्वारे व्यवहार करावेत, जेणेकरून पारदर्शकता राहते.

SCROLL FOR NEXT