बँका दंड का वसूल करतात? जाणून घ्या 'मिनिमम बॅलन्स'चे रहस्य!

रिझर्व्ह बँकेचे निकष आणि खाते व्यवस्थापनाचा खर्च; ग्राहकांनी 'हा' दंड कसा टाळावा?
Bank minimum balance rules -Why banks charge minimum balance penalty
बँक बॅलन्स' कमी होताच दंड का लागतो? ९०% खातेधारकांना माहितच नाही हे खरे कारण!
Published on

मुंबई: आजच्या डिजिटल युगात बँक खाते ही प्रत्येकाची दैनंदिन गरज बनली आहे. पगार जमा होण्यापासून ते ऑनलाइन खरेदी, वीजबिल भरणे आणि UPI व्यवहारांपर्यंत सर्वच गोष्टींसाठी आपण बँकेवर अवलंबून असतो. मात्र, अनेकदा खात्यातील रक्कम कमी झाल्यावर किंवा किमान शिल्लक (Minimum Balance) न ठेवल्यास बँक आपल्याला दंड आकारते. अशा वेळी "आपलेच पैसे बँकेत असताना ते कमी झाले म्हणून दंड का भरायचा?" असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांच्या मनात येतो. प्रत्यक्षात यामागे केवळ बँकांचे नियम नसून, बँकिंग व्यवसायाची संपूर्ण कार्यपद्धती आणि अर्थशास्त्र दडलेले आहे.

सामान्यतः अनेकांना असे वाटते की बँका केवळ सेवा शुल्कातून पैसे कमावतात, पण वास्तव वेगळे आहे. बँकेच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे कर्जवाटप. ग्राहकांनी बचत खात्यात ठेवलेली रक्कम बँका गृहकर्ज, वाहनकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा उद्योगांना कर्ज म्हणून देतात. या कर्जांवर मिळणाऱ्या व्याजातून बँकांची मुख्य कमाई होते. यासाठी बँकांकडे ठेवींचा मोठा साठा असणे आवश्यक असते. ग्राहकांनी किमान शिल्लक कायम ठेवल्यास बँकेकडे कर्ज देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध राहतो. मात्र, शिल्लक कमी झाल्यास बँकेची कर्ज देण्याची क्षमता घटते, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या उत्पन्नावर होतो.

Bank minimum balance rules -Why banks charge minimum balance penalty
बँक खातेधारकांना मोठा दिलासा! 'मिनिमम बॅलन्स' शुल्क रद्द

बचत खाते चालवण्यासाठी बँकेला कोणताही खर्च येत नाही, असा एक समज ग्राहकांमध्ये असतो. परंतु, प्रत्येक खात्याच्या देखभालीसाठी बँकेला मोठा खर्च करावा लागतो. यामध्ये ATM नेटवर्क चालवणे, नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग अ‍ॅप्सचे व्यवस्थापन, ग्राहक सेवा केंद्र (Call Center) आणि तांत्रिक व्यवहार प्रणाली यांसारख्या सुविधांचा समावेश होतो. जर एखादा ग्राहक खात्यात सतत अत्यंत कमी शिल्लक ठेवत असेल, तर बँकेच्या दृष्टीने ते खाते 'खर्चिक' ठरते. अशा परिस्थितीत किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल आकारला जाणारा दंड हा त्या खात्याच्या व्यवस्थापन खर्चाची काही प्रमाणात भरपाई करण्याचा एक मार्ग असतो.

हा दंडाचा पैसा जातो कुठे?

ग्राहकांकडून आकारण्यात येणारा हा दंड कोणत्याही विशिष्ट सेवेसाठी वापरला जात नाही. ही रक्कम बँकेच्या 'नॉन-इंटरेस्ट इन्कम' (व्याजाव्यतिरिक्त मिळणारे उत्पन्न) चा भाग बनते. सोप्या भाषेत सांगायचे तर, ग्राहकांनी कमी शिल्लक ठेवल्यामुळे बँकेला जे संभाव्य उत्पन्न गमवावे लागते, त्याची भरपाई या दंडाच्या माध्यमातून केली जाते.

रिझर्व्ह बँकेचे (RBI) कडक नियम

भारतीय रिझर्व्ह बँक सर्व बँकांसाठी काही आर्थिक निकष निश्चित करते. यामध्ये 'कॅश रिझर्व्ह रेशो' (CRR) आणि 'स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो' (SLR) यांसारख्या नियमांचा समावेश होतो. बँकांकडे पुरेशा ठेवी असल्यास या नियमांचे पालन करणे सोपे जाते. मात्र ठेवींचे प्रमाण कमी झाल्यास बँकेचा आर्थिक व्यवस्थापनाचा खर्च वाढतो. म्हणूनच बँका ग्राहकांना खात्यात ठरावीक रक्कम कायम ठेवण्यास प्रोत्साहित करतात.

सरकारी आणि खासगी बँकांच्या नियमांत फरक का असतो?

सर्व बँकांचे किमान शिलकीचे नियम सारखे नसतात. अगदी ग्रामीण भागात ही मर्यादा केवळ ५०० रुपयांपर्यंत असू शकते. काही प्रकरणांमध्ये सरकारी बँका शून्य शिल्लक खात्याची सुविधाही देतात, कारण सर्वसामान्यांना बँकिंग प्रवाहात आणणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असते.

दुसरीकडे, खासगी बँकांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा तुलनेने जास्त (उदा. ५,००0 ते १०,००० रुपये किंवा अधिक) असते. प्रगत डिजिटल सुविधा, जलद सेवा, मोठे ATM नेटवर्क आणि आधुनिक बँकिंग अनुभव देण्यासाठी हा नियम आवश्यक असल्याचा दावा खासगी बँकांकडून केला जातो.

Bank minimum balance rules -Why banks charge minimum balance penalty
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय: झिरो-बॅलन्स खात्यावर मिळणार फुल बँकिंग सुविधा

अनावश्यक दंड कसा टाळावा?

जर तुम्हाला तुमच्या खात्यात वारंवार किमान शिल्लक राखणे शक्य होत नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. अनेक सरकारी बँका 'शून्य शिल्लक बचत खाते' उपलब्ध करून देतात. तसेच रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार खासगी बँकांनाही 'बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट अकाउंट' (BSBDA) देणे बंधनकारक आहे. या खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याची कोणतीही अट नसते, मात्र यात महिन्याला ठराविक व्यवहार करण्याची मर्यादा असू शकते.

त्यामुळेच, कोणतेही नवीन बँक खाते उघडण्यापूर्वी किंवा आपल्या खात्याचा प्रकार बदलण्यापूर्वी त्याच्या अटी, नियम आणि सेवा शुल्क नीट समजून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून अनावश्यक दंड टाळता येऊ शकेल.

Banco News
www.banco.news