डॉलर आणखी महागला, रुपया आणखी कोसळला!

परकीय भांडवल बाहेर गेल्याने चलनावर दबाव; नागरिकांना सोने आणि पेट्रोल खरेदी कमी करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन.
Indian Rupee falling reasons
जागतिक घडामोडींचा फटका; रुपया ७९ पैशांनी घसरून ९५.२८ वर स्थिरावला
Published on

मुंबई: जागतिक बाजारातील घडामोडी आणि देशांतर्गत वाढत्या आर्थिक दबावामुळे भारतीय रुपयाची घसरण थांबण्याचे नाव घेत नाहीये. आंतरबँक परकीय चलन बाजारात सोमवारी रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत तब्बल ७९ पैशांनी कोसळला आणि ९५.२८ या आपल्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर बंद झाला. डॉलरचे जागतिक बाजारातील वाढते वर्चस्व आणि भारतामधून परकीय भांडवल सातत्याने बाहेर जात असल्याने रुपयावर हा प्रचंड दबाव निर्माण झाला आहे.

या ऐतिहासिक घसरणीचे मुख्य कारण जागतिक राजकारणात दडले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पश्चिम आशियातील शांतता प्रस्तावावर इराणने दिलेला प्रतिसाद फेटाळून लावला. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०५ अमेरिकी डॉलरवर पोहोचल्या आहेत, तर 'डॉलर इंडेक्स'ने ९८ ची पातळी ओलांडली आहे. भारत आपल्या गरजेच्या ८० टक्क्यांहून अधिक कच्चे तेल आयात करत असल्याने, डॉलर महागल्याचा आणि तेल दरात वाढ झाल्याचा थेट फटका रुपयाला बसला.

बाजारातील चढ-उतार क्रम

  • सुरवात: आंतरबँक परकीय चलन बाजारात सोमवारी रुपया ९४.९७ वर उघडला.

  • चढ-उतार: सत्रादरम्यान रुपयाने ९४.८७ ते ९५.३४ या श्रेणीत प्रवास केला.

  • अंतिम स्थिती: व्यवहारअखेर रुपया ७९ पैशांच्या घसरणीसह ९५.२८ या ऐतिहासिक नीचांकी बंद पातळीवर स्थिरावला. (गत शुक्रवारी रुपया ९४.४९ वर बंद झाला होता).

नोंदनीय बाब म्हणजे, यापूर्वी ४ मे रोजी रुपयाने ९५.२३ ही नीचांकी बंद पातळी गाठली होती, तर ५ मे रोजी व्यवहारादरम्यान तो ९५.४४ या आतापर्यंतच्या सर्वात निचांकी पातळीवर गेला होता.

Indian Rupee falling reasons
रुपया सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेची नवी रणनीती

पंतप्रधानांचे देशातील नागरिकांना 'काटकसरीचे' आवाहन

देशाची वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि परकीय चलन साठा वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. पंतप्रधानांनी देशातील नागरिकांना पेट्रोल, सोने आणि परदेश दौरे यांसारख्या गोष्टींवरील खर्च कमी करण्याचे आणि काटकसर पाळण्याचे आवाहन केले आहे.

"परकीय चलनाची बचत करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात देशांतर्गत पेट्रोल वा सोने यांची मागणी मर्यादित करणे गरजेचे आहे. या काटकसरीच्या उपायांमुळे अल्पकाळात देशाच्या आर्थिक वृद्धीचा (Economic Growth) वेग मंदावू शकतो," असे भाष्य पंतप्रधानांनी केले आहे. या आवाहनामुळे बाजारपेठेतील गुंतवणूकदारांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

फॉरेक्स क्षेत्रातील तज्ज्ञ आणि 'फिनरेक्स ट्रेझरी अ‍ॅडव्हायझर्स'चे कार्यकारी संचालक अनिल कुमार भन्साळी यांनी सांगितले की, "ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे कच्च्या तेलाचे दर आणि डॉलर इंडेक्स मजबूत स्थितीत आहेत. यामुळे बाजारात डॉलरची मागणी प्रचंड वाढली आहे. मंगळवारी रुपया ९४.७५ ते ९५.५० या मर्यादेत राहण्याची शक्यता आहे."

जागतिक बाजारात जोपर्यंत कच्च्या तेलाचे दर स्थिरावत नाहीत आणि परकीय गुंतवणूकदार (FPI) भारतीय बाजारातील विक्री थांबवत नाहीत, तोपर्यंत रुपयावरील हा ताण कायम राहण्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Banco News
www.banco.news