वित्तीय क्षेत्रात तंत्रज्ञानासोबत सुरक्षेची चौकटही मजबूत हवी

"डिजिटल वेगात धोके संपत नाहीत;" ग्राहक-विश्वास आणि कडक नियंत्रणांवर रिझर्व्ह बँक डेप्युटी गव्हर्नर स्वामिनाथन जे यांचा भर.
RBI regulations on fintech app outsourcing
स्पीडपेक्षा सुरक्षा महत्त्वाची! रिझर्व्ह बँकेचा वित्तीय संस्थांना महत्त्वाचा इशारा
Published on: 

मुंबई: वित्त क्षेत्रातील प्रक्रिया जलद करण्याच्या नादात सुरक्षेशी तडजोड केली जाऊ शकत नाही. "वित्त क्षेत्रातील प्रत्येक अडथळा म्हणजे अकार्यक्षमता नव्हे; काही तपासण्या आणि संतुलन फसवणूक व चुका टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात," असे प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) डेप्युटी गव्हर्नर स्वामिनाथन जे यांनी केले.

मुंबईत आयोजित 'एफई मॉडर्न बीएफएसआय समिट २०२६' मध्ये १५ ऑक्टोबर रोजी विशेष भाषणात ते बोलत होते. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात वित्तीय संस्थांनी आपली नियंत्रणे आणि ग्राहक-विश्वास अधिक मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.

तंत्रज्ञान बदलले तरी मूळ धोके तेच

डिजिटल युगात अनेक प्रक्रिया स्वयंचलित होत असल्या तरी मूलभूत धोके नाहीसे होत नाहीत, याकडे लक्ष वेधताना स्वामिनाथन म्हणाले:

"स्वतंत्र पडताळणी, 'मेकर-चेकर' व्यवस्था किंवा 'कूलिंग-ऑफ' कालावधीमुळे प्रक्रियेला वेळ लागू शकतो. परंतु, यामुळे त्रुटी, फसवणूक किंवा प्रतिकूल निवडीची (Adverse Selection) शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते. जर मॅन्युअल तपासणीची जागा अल्गोरिदमने घेतली किंवा कर्जाचे अंडररायटिंग तत्काळ झाले, तरी मूळ धोका संपत नाही; त्यामुळे नियंत्रण यंत्रणाही या तंत्रज्ञानासोबत विकसित झाली पाहिजे."

त्यांनी स्पष्ट केले की संस्थांची वाढ ज्या गतीने आणि स्वरूपात होत आहे, त्याच गतीने त्यांचे नियंत्रण वातावरण (Control Environment) देखील सक्षम राहिले पाहिजे.

RBI regulations on fintech app outsourcing
ग्राहक अनुभवासाठी वित्तीय संस्थांचा AI वर वाढता भर

आउटसोर्सिंगने जबाबदारी संपत नाही

तृतीय पक्षांमार्फत (Third Party) चालणाऱ्या उपक्रमांवर भाष्य करताना डेप्युटी गव्हर्नर म्हणाले की, फिनटेक कंपन्यांमार्फत कर्ज देणे किंवा बाह्य प्लॅटफॉर्मद्वारे सेवा पुरवणे शक्य आहे. मात्र, काम बाह्यस्रोतांकडे (Outsourcing) सोपवल्याने संस्थेच्या परवान्याशी (License) संबंधित कायदेशीर व नैतिक जबाबदारी हस्तांतरित होत नाही. अंतिम जबाबदारी ही संबंधित वित्तीय संस्थेचीच राहील.

वित्तीय संस्थांवरील विश्वासाचे महत्त्व अधोरेखित करताना स्वामिनाथन म्हणाले की, विश्वास हा ताळेबंदात (Balance Sheet) स्पष्ट दिसत नाही; पण त्याला तडा गेल्यास त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. ग्राहक गमावणे, कायदेशीर खटले, नियामक दंड आणि प्रतिष्ठेचे नुकसान या स्वरूपात याची मोठी किंमत मोजावी लागते.

  • डेटाचा वाजवी वापर: ग्राहकांच्या डेटाबाबत केवळ 'संमती मिळवली आहे' एवढेच पुरेसे नाही, तर तो डेटा ग्राहकाच्या वाजवी अपेक्षेनुसार (Reasonable Expectations) वापरला जातोय का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

  • तक्रारींमधून शिकण्याची गरज: ग्राहकांच्या तक्रारींकडे केवळ 'प्रकरण बंद करणे' या दृष्टीने पाहू नये. तक्रारींमधील समान धागा शोधल्यास उत्पादन रचना, प्रोत्साहन संरचना (Incentive Structure) किंवा डिजिटल प्रवासातील कमतरता उघड होऊ शकतात.

RBI regulations on fintech app outsourcing
एआयच्या अधिक प्रभावी वापरासाठी काय करावे भारतीय बँका आणि वित्तीय संस्थांनी!

एका चुकीमुळे संपूर्ण प्रणालीवरील विश्वास धोक्यात

स्वामिनाथन यांनी स्पष्ट केले की फसवणुकीचा बळी ठरलेला सामान्य ग्राहक ही चूक नक्की कोणाची (फंड हस्तांतरित करणारी संस्था की बनावट खाते असलेली बँक) यात फरक करत नाही. ग्राहकाच्या दृष्टीने संपूर्ण वित्तीय प्रणालीच अयशस्वी ठरलेली असते. त्यामुळे प्रणालीतील एका घटकाची कमकुवत नियंत्रणे संपूर्ण वित्तीय व्यवस्थेच्या विश्वासाला धक्का पोहोचवू शकतात.

शेवटी बोलताना त्यांनी नमूद केले की, भांडवल आणि तरलता (Liquidity) हे मूलभूत घटक महत्त्वाचे आहेतच; परंतु आजच्या परस्परांशी जोडलेल्या डिजिटल जगात एखादी संस्था किती लवकर समस्या ओळखते, निर्णय घेते आणि सेवा पूर्ववत करते, यावर तिची खरी लवचिकता (Resilience) ठरते.

Banco News
www.banco.news