

मुंबई: ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आता सामान्य ग्राहकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. डिजिटल पेमेंट करताना होणारी फसवणूक टाळण्यासाठी आता १०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर १ तासाचा विलंब (Time Buffer) लावण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
१. व्यवहार रद्द करण्याची संधी: जर तुम्ही कोणाला १०,००० रुपयांपेक्षा जास्त पैसे पाठवले आणि तुम्हाला फसवणुकीची शंका आली, तर आता तुमच्याकडे तो व्यवहार रद्द करण्यासाठी १ तासाचा वेळ असेल. या एक तासात पैसे समोरच्या व्यक्तीला लगेच मिळणार नाहीत.
२. घाईने होणारी फसवणूक थांबणार: अनेकदा सायबर चोरटे भीती दाखवून किंवा घाई करून लोकांकडून पैसे उकळतात. रिझर्व्ह बँकेच्या या नियमामुळे ग्राहकांना शांतपणे विचार करायला वेळ मिळेल.
३.ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सुरक्षा: ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांग व्यक्तींनी ५०,००० रुपयांपेक्षा जास्त व्यवहार केल्यास, त्यांच्या घरातील एखाद्या विश्वासू व्यक्तीची मंजुरी (Permission) घेणे अनिवार्य करण्याचा विचार सुरू आहे.
४. 'किल स्विच' (Kill Switch): जर तुम्हाला एखादा व्यवहार संशयास्पद वाटला, तर एका क्लिकवर तुमचे डिजिटल पेमेंट बंद करण्याची सुविधा (Kill Switch) दिली जाणार आहे.
५. मोठ्या रकमांवर नजर: वर्षाकाठी २५ लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहार होणाऱ्या खात्यांची कडक तपासणी केली जाईल. तसेच संशयास्पद बँक खात्यांवर वार्षिक मर्यादा घातली जाईल.
६. व्यापारी व्यवहारांना सवलत: हा नियम केवळ एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला पाठवलेल्या पैशांसाठी असेल. तुम्ही दुकानात किंवा व्यापाऱ्यांना जे पेमेंट करता, त्यावर याचा परिणाम होणार नाही.
रिझर्व्ह बँकेने या प्रस्तावावर जनतेचे मत मागवले आहे. लोकांच्या सूचनांचा विचार करून लवकरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. यामुळे सर्वसामान्य माणसाचे कष्टाचे पैसे अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल.