पीएफ क्लेम वारंवार रिजेक्ट होतोय? पुन्हा अर्ज करण्यापूर्वी नक्की वाचा!

UAN-आधार विसंगतीपासून ते KYC अपूर्ण असण्यापर्यंत, क्लेम मंजूर करण्यासाठी 'ही' काळजी घेणे आवश्यक.
PF claim rejected - PF withdrawal rejection reasons
PF खात्यातून पैसे काढताना अडथळा? ५ मिनिटांत जाणून घ्या १० मोठी कारणे!
Published on: 

कठीण काळात किंवा तातडीच्या गरजेवेळी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) मधील साचलेला निधी हा कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार असतो. वैद्यकीय आणीबाणी, मुलांचे लग्न, नवीन घर खरेदी किंवा नोकरी बदलल्यानंतर उद्भवणाऱ्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी कर्मचारी पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी अर्ज करतात. परंतु, अनेकदा ऑनलाइन दावा दाखल केल्यानंतर तो नाकारला जातो (PF Claim Rejection). यामुळे कर्मचाऱ्यांना नाहक मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागते.

अनेकदा कोणतीही मोठी चूक नसताना, केवळ ऑनलाइन नोंदींमधील किरकोळ विसंगतीमुळे ईपीएफओकडून अर्ज फेटाळला जातो. जर तुमचाही पीएफ दावा नाकारला गेला असेल, तर घाबरून न जाता त्यामागील कारणे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

पीएफ दावा नाकारला जाण्यामागे प्रामुख्याने पुढील १० कारणे कारणीभूत ठरतात:

PF claim rejected - PF withdrawal rejection reasons
PF बॅलन्सपासून ते UPI द्वारे पैसे काढण्यापर्यंत... जाणून घ्या नवीन फीचर्स!

पीएफ दावा नाकारण्याची १० प्रमुख कारणे :

१. UAN आणि आधार तपशीलात विसंगती:

युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि आधार कार्डवरील नाव, जन्मतारीख किंवा इतर वैयक्तिक माहिती जुळत नसल्यास ईपीएफओकडून दावा तात्काळ नाकारला जातो.

२. बँक खात्याची चुकीची माहिती:

ईपीएफओ प्रणालीत नोंदणीकृत असलेला बँक खाते क्रमांक, IFSC कोड किंवा नाव यामध्ये स्पेलिंगची चूक असल्यास निधी हस्तांतरित होऊ शकत नाही.

३. बँक खाते बंद किंवा निष्क्रिय असणे:

ईपीएफओ पोर्टलवर लिंक असलेले बँक खाते जर बंद झाले असेल किंवा दीर्घकाळ व्यवहार न झाल्याने निष्क्रिय (Inactive) झाले असेल, तर पीएफची रक्कम जमा होत नाही.

४. अपूर्ण किंवा असत्यापित KYC:

आधार, बँक खाते आणि पॅन (PAN) यांसारखी केवायसी (KYC) माहिती पूर्ण नसेल किंवा नियोक्त्याकडून (Employer) सत्यापित (Approve) झालेली नसेल, तर दावा प्रक्रियेत अडथळा येतो.

५. नाव व जन्मतारखेतील फरक:

आधार, ईपीएफओ आणि बँक खात्याच्या नोंदींमध्ये नाव किंवा जन्मतारीख वेगवेगळी असल्यास सिस्टीम जुळवणी करू शकत नाही, ज्यामुळे अर्ज फेटाळला जातो.

६. कंपनीच्या नोंदींमधील चुका:

कर्मचाऱ्याने नोकरीत रुजू झाल्याची (Date of Joining) तारीख कंपनीकडून ईपीएफओ पोर्टलवर चुकीची नोंदवली गेल्यास दाव्यावर थेट परिणाम होतो.

७. नोकरी सोडल्याची तारीख (Date of Exit) अद्ययावत न करणे:

नोकरी सोडल्यानंतर प्रणालीत 'Date of Exit' नोंदवणे अनिवार्य असते. ही तारीख अद्ययावत नसेल, तर अंतिम पैसे काढण्याचा (Full & Final Settlement) दावा नाकारला जातो.

८. चुकीचा फॉर्म किंवा कारणाची निवड:

पीएफ काढण्याच्या विविध कारणांसाठी (उदा. आजारपण, शिक्षण, घर खरेदी) वेगवेगळे नियम व फॉर्म असतात. चुकीचा पर्याय किंवा कारण निवडल्यास अर्ज फेटाळला जातो.

९. प्रलंबित दावा किंवा खाते हस्तांतरण:

जर तुमचा पूर्वीचा एखादा दावा प्रलंबित (Pending) असेल किंवा जुन्या खात्यातील रक्कम नवीन खात्यात हस्तांतरित (PF Transfer) झालेली नसेल, तर नवीन अर्जावर प्रक्रिया होत नाही.

१०. पात्रतेच्या अटींची पूर्तता न होणे:

पीएफ निधीतून आगाऊ रक्कम (Advance) किंवा पूर्ण रक्कम काढण्यासाठी ठराविक सेवा कालावधीचे नियम असतात. या अटी पूर्ण न करता अर्ज केल्यास दावा नाकारला जातो.

दावा नाकारल्यास कर्मचाऱ्यांनी काय करावे?

पीएफचा दावा नाकारला गेल्यास लगेचच पुन्हा नवीन अर्ज करण्याची घाई करू नका. सर्वप्रथम खालील पायऱ्यांचे पालन करा:

  • कारणाची तपासणी: ईपीएफओच्या सदस्य सेवा पोर्टलवर (Member Service Portal) लॉग इन करून दावा नाकारण्याचे अचूक कारण (Rejection Reason) तपासा.

  • माहितीची पडताळणी: UAN, आधार, बँक खाते, पॅन आणि केवायसी स्थितीची पुन्हा एकदा कसून तपासणी करा.

  • स्वतः दुरुस्ती करा: नोकरी सोडल्याची तारीख (Date of Exit) किंवा वैयक्तिक माहितीतील किरकोळ बदल कर्मचारी स्वतः सदस्य पोर्टलवरून अद्ययावत करू शकतात.

  • कंपनीशी संपर्क: कंपनीच्या नोंदींमध्ये किंवा रुजू झाल्याच्या तारखेत चूक असल्यास, आपल्या आस्थापनेच्या एचआर (HR) किंवा पीएफ विभागाशी संपर्क साधून नोंदी दुरुस्त करून घ्या.

सर्व माहिती अचूक असल्याची व प्रणालीत अद्ययावत झाल्याची खात्री पटल्यानंतरच पुन्हा नवीन दावा दाखल करा. यामुळे तुमचा अर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढेल आणि पैसे वेळेत खात्यात जमा होतील.

Banco News
www.banco.news