पॅन कार्ड आहे ? मग 'हे' वाचल्याशिवाय पुढचा व्यवहार करू नका!

तुमची मालमत्ता आणि बँकिंग व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी 'ही' माहिती आवश्यक
पॅन कार्ड
pancard new rules 2026
Published on

मुंबई: बहुतांश नागरिकांना वाटते की कायम खाते क्रमांक म्हणजेच पॅन (PAN) कार्डाचा वापर केवळ आयकर विवरणपत्र (ITR) भरण्यासाठीच होतो. मात्र, आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने पॅन कार्डच्या वापराबाबत कठोर नियम केले आहेत. तुम्ही जर विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार करत असाल, तर पॅन कार्ड अनिवार्य आहे. योग्य वेळी पॅन क्रमांक न दिल्यास तुमचे महत्त्वाचे आर्थिक व्यवहार थांबू शकतात.

आयकर नियमांच्या नियम 114B नुसार, कर चुकवेगिरी रोखण्यासाठी खालील १७ व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.

पॅन कार्ड अनिवार्य असलेले १७ महत्त्वाचे व्यवहार:

१. वाहन खरेदी-विक्री: दुचाकी वगळता इतर कोणत्याही मोटार वाहनांची खरेदी किंवा विक्री करताना.

२. बँक खाते: बँकिंग संस्था किंवा सहकारी बँकांमध्ये नवीन खाते उघडण्यासाठी.

३. क्रेडिट-डेबिट कार्ड: नवीन क्रेडिट किंवा डेबिट कार्डसाठी अर्ज करताना.

४. डिमॅट खाते: शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी लागणारे डिमॅट खाते उघडण्यासाठी.

५. हॉटेल बिल: हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेचे रोख पेमेंट करण्यासाठी.

६. परदेश प्रवास: परदेशी प्रवासासाठी किंवा परकीय चलन खरेदीसाठी ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम भरताना.

७. म्युच्युअल फंड: ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक करताना.

८. डिबेंचर्स आणि बॉण्ड्स: कंपन्यांचे डिबेंचर्स किंवा बॉण्ड्स खरेदी करण्यासाठी ५०,००० रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करताना.

९. RBI बॉण्ड्स: रिझर्व्ह बँकेने जारी केलेले बॉण्ड्स खरेदीसाठी ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरताना.

१०. बँक डिपॉझिट: बँक किंवा सहकारी बँकेत एका दिवसात ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रोकड जमा करण्यासाठी.

पॅन कार्ड
पॅन कार्ड नियमात १ एप्रिलपासून मोठे बदल

११. बँक ड्राफ्ट/पे ऑर्डर: ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेचा बँक ड्राफ्ट किंवा बँकर्स चेक रोखीने खरेदी करण्यासाठी.

१२. मुदत ठेवी (FD): बँक, पोस्ट ऑफिस किंवा सहकारी बँकेत एका आर्थिक वर्षात ५ लाख रुपयांपेक्षा जास्त मुदत ठेव ठेवण्यासाठी.

१३. प्रीपेड इन्स्ट्रुमेंट्स: डिजिटल वॉलेट किंवा प्रीपेड कार्डमध्ये एका वर्षात ५०,००० रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करण्यासाठी.

१४. विमा हप्ता: विमा कंपनीला एका वर्षात ५०,००० रुपयांपेक्षा जास्त जीवन विमा प्रीमियम भरताना.

१५. अनलिस्टेड शेअर्स: स्टॉक एक्सचेंजवर नोंदणी नसलेल्या कंपन्यांच्या शेअर्सची १ लाख रुपयांपेक्षा जास्त खरेदी-विक्री करताना.

१६. स्थावर मालमत्ता: १० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या जमिनी, घर किंवा मालमत्तेची खरेदी-विक्री करताना.

१७. इतर वस्तू व सेवा: वरील व्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तू किंवा सेवांच्या २ लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहारासाठी.

१ एप्रिल २०२६ पासून पॅन अर्जाच्या नियमांत बदल

जर तुमच्याकडे अजूनही पॅन कार्ड नसेल किंवा तुम्ही नवीन काढणार असाल, तर केंद्र सरकारने १ एप्रिल २०२६ पासून नवीन नियम लागू केले आहेत. आता केवळ आधार कार्डच्या आधारावर पॅन कार्ड मिळणार नाही. नवीन अर्जासोबत 'जन्मतारखेचा पुरावा' (Proof of Birth) देणे अनिवार्य झाले आहे.

जन्मतारखेसाठी ग्राह्य धरली जाणारी कागदपत्रे:

  • जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate)

  • मतदार ओळखपत्र (Voter ID)

  • १० वीचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र

  • पासपोर्ट

  • ड्रायव्हिंग लायसन्स

आर्थिक शिस्त पाळण्यासाठी आणि भविष्यातील कायदेशीर कटकटी टाळण्यासाठी आपले पॅन कार्ड अपडेट ठेवा आणि वरील व्यवहारांच्या वेळी त्याचा योग्य वापर करा.

Banco News
www.banco.news