

नागपुर (हुडकेश्वर): नागपुरात सायबर गुन्हेगारीचे मोठे जाळे उघडकीस आले असून, सर्वसामान्यांच्या खऱ्या कागदपत्रांच्या आधारे 'म्युल' बँक खाती उघडून ती सायबर भामट्यांना पुरवणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाला आहे. नागपूर पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरसाळा येथे केलेल्या धडक कारवाईत २०० हून अधिक एटीएम कार्ड्स, २० हून अधिक क्यूआर कोड क्रमांकांचे दस्तऐवज आणि १० क्यूआर कोड स्कॅनर मशीन्स जप्त केल्या आहेत.
या कारवाईने सायबर गुन्हेगारांच्या आर्थिक नाड्या आवळण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले असले, तरी टोळीचा मास्टरमाईंड सलीम शेख आपल्या पाच साथीदारांसह फरार होण्यात यशस्वी ठरला आहे. सायबर गुन्हेगारीचे मोठे जाळे उघडकीस आले असून, सर्वसामान्यांच्या खऱ्या कागदपत्रांच्या आधारे 'म्युल' बँक खाती उघडून ती सायबर भामट्यांना पुरवणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
नागपूर पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरसाळा येथे केलेल्या धडक कारवाईत २०० हून अधिक एटीएम कार्ड्स, २० हून अधिक क्यूआर कोड क्रमांकांचे दस्तऐवज आणि १० क्यूआर कोड स्कॅनर मशीन्स जप्त केल्या आहेत. या कारवाईने सायबर गुन्हेगारांच्या आर्थिक नाड्या आवळण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले असले, तरी टोळीचा मास्टरमाईंड सलीम शेख आपल्या पाच साथीदारांसह फरार होण्यात यशस्वी ठरला आहे.
सायबर शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवारी नरसाळा येथील सलीम शेख याच्या भाड्याच्या खोलीवर छापा टाकला. या कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून एका तरुणीला ताब्यात घेतले आहे. खोलीची झडती घेतली असता पोलिसांच्याही पायाखालची वाळू सरकली. तिथे मिळालेल्या एका लॅपटॉपसह २०० वेगवेगळ्या बँक खात्यांची एटीएम कार्ड्स आणि डिजिटल व्यवहारांसाठी वापरले जाणारे क्यूआर कोड स्कॅनर्स हस्तगत करण्यात आले.
तपास अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, ही टोळी गरजू किंवा भोळ्याभाबड्या नागरिकांना आर्थिक आमिष दाखवून अथवा त्यांच्या नकळत त्यांच्या खऱ्या कागदपत्रांचा (केवायसी) वापर करून बँकांमध्ये खाती उघडत असे. त्यानंतर ही खाती महिनाकाठी मोठ्या रकमेच्या भाड्यावर सायबर गुन्हेगारांना बेकायदेशीर व्यवहारांसाठी उपलब्ध करून दिली जात असत.
पोलिसांनी जप्त केलेल्या लॅपटॉपची आता फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) कडून कसून चौकशी केली जात आहे. या लॅपटॉपमध्ये या टोळीने आतापर्यंत किती लोकांची खाती उघडली, ही खाती देश-परदेशातील कोणत्या सायबर गुन्हेगारांना विकली किंवा भाड्याने दिली, आणि त्या खात्यांमधून आतापर्यंत किती कोटी रुपयांचा काळा पैसा फिरवण्यात आला, याचा संपूर्ण कच्चाचिट्ठा असण्याची शक्यता आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी तात्काळ या २०० संशयित बँक खात्यांमधील व्यवहार रोखण्यासाठी (Account Freeze) संबंधित बँकांना निर्देश दिले आहेत. या खात्यांचा वापर करून देशभरात कुठे कुठे ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे, याचा माग काढण्याचे काम सध्या तपास यंत्रणा करत आहेत.
'म्युल' म्हणजेच दुसऱ्याच्या नावाने उघडलेल्या खात्यांचा सायबर गुन्ह्यांतील वापर नागपुरात नवीन नाही. यापूर्वीही शहरात राणा प्रतापनगर, तहसील आणि शांतिनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नागरिकांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून शेकडो म्युल खाती उघडल्याचे आणि त्यातून कोट्यवधींचे बेकायदेशीर व्यवहार झाल्याचे समोर आले होते. आता हुडकेश्वरमधील या ताज्या प्रकरणामुळे नागपूर शहर हे सायबर भामट्यांच्या म्युल खात्यांचे केंद्र बनत आहे की काय, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून, फरार झालेला मास्टरमाईंड सलीम शेख आणि त्याच्या पाच साथीदारांच्या अटकेसाठी विशेष पथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. ताब्यात घेतलेल्या तरुणीची कसून चौकशी सुरू असून, तिच्याकडून या टोळीच्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचे महत्त्वाचे सुगावा पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन:
आपली वैयक्तिक कागदपत्रे (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो) कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हाती सोपवू नका. थोड्या पैशांच्या आमिषाला बळी पडून स्वतःच्या नावाने बँक खाते उघडून ते दुसऱ्याला वापरण्यास देणे हा गंभीर आणि कायदेशीर गुन्ह्याचा भाग आहे. अशा प्रकरणांत खातेदारही तितकाच दोषी धरला जाऊ शकतो, याचे भान नागरिकांनी ठेवावे.