

कोल्हापूर : विनासायास कमाईचे, पार्ट-टाइम जॉब्सचे किंवा गुंतवणुकीवर अवाजवी परताव्याचे आमिष दाखवून सर्वसामान्यांना लुटणाऱ्या सायबर गुन्हेगारांविरोधात कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाने मोहीम तीव्र केली आहे. गुन्ह्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या बनावट आणि संशयास्पद बँक खात्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी सायबर क्राईम सेलने कठोर पावले उचलली असून, सध्या जिल्ह्यातील सुमारे ३०० संशयास्पद बँक खाती चौकशीच्या रडारवर आहेत.
गेल्या अवघ्या दोन महिन्यांत मोहीम राबवून अशा ३० बनावट बँक खात्यांचा व्यवहार पूर्णपणे बंद (Block) करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
सायबर गुन्हेगार आर्थिक फसवणूक केल्यानंतर आपली खरी ओळख लपवण्यासाठी आणि चोरीचा पैसा सुरक्षित ठिकाणी वळवण्यासाठी सामान्य नागरिकांच्या किंवा भामट्यांच्या नावे उघडलेल्या 'म्युल अकाउंट्स' (Mule Accounts) चा वापर करतात. एका खात्यात आलेली रक्कम क्षणात इतर अनेक खात्यांमध्ये फिरवून ती रोखीने काढली जाते.
महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत अशा बनावट खात्यांचा वापर वाढला असून, या साखळीचा मुख्य धागा पकडण्यासाठी कोल्हापूरच्या सायबर क्राईम सेलने शोधमोहीम हाती घेतली आहे.
तपासाचा रोख बँक खात्यांवर...
"सायबर गुन्हेगारीला चाप लावायचा असेल, तर ज्या खात्यांमधून हा बेकायदेशीर व्यवहार चालतो ती खाती बंद करणे आणि त्यामागील सूत्रधारांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. जिल्ह्यात आढळलेल्या ३०० संशयास्पद खात्यांची कसून चौकशी सुरू असून, यात दोषी आढळणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जातील."
- नीलोत्पल (पोलिस अधीक्षक, कोल्हापूर)
कोल्हापूर जिल्ह्यात सायबर फसवणुकीच्या ४९४ ग्राहकांकडून सुमारे १५ लाख रुपयांपर्यंत फसवणूक झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सायबर क्राईम सेलने तत्परतेने सूत्रे हलवून यातील ३ लाख रुपयांची रक्कम विविध संशयित खात्यांमध्ये रोखून धरली (Freeze केली) आणि कायदेशीर प्रक्रियेनंतर ती संबंधित पीडित ग्राहकांना परत मिळवून दिली आहे.
उर्वरित १२ लाख रुपयांची रक्कमही टप्प्याटप्प्याने ग्राहकांना परत मिळवून देण्याची कायदेशीर प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
बनावट खाती उघडली कशी जातात, यावरही आता बँक प्रशासनासोबत सायबर सेल समन्वय साधत आहे. भाड्याने दिलेली खाती किंवा कागदपत्रांचा गैरवापर करून उघडलेली खाती सायबर गुन्ह्यांचा कणा बनली आहेत. त्यामुळे बँकांनीही केवायसी (KYC) पडताळणी अधिक कडक करावी आणि नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडून स्वतःचे बँक खाते, ओटीपी (OTP) किंवा एटीएम कार्ड कोणालाही वापरण्यास देऊ नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.