

ठाणे : डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांचे नवनवे फंडे समोर येत असतानाच, ठाण्यातील मुंब्रा परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मोबाईल हॅक करून एका उच्चशिक्षित महिलेच्या आणि तिच्या पतीच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख ३४ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली आहे. 'मोबाईल ऑटोमॅटिक अपडेट' झाल्यानंतर हा सर्व प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस तक्रारीनुसार, मुंब्रा-कौसा परिसरात राहणाऱ्या निखत अब्दुल खालीद शेख (वय ३०, बी.कॉम सुशिक्षित) या एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. २७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचा मोबाईल अचानक ऑटोमॅटिक अपडेट मोडवर गेला आणि फोन रिबूट (Reboot) झाला. सुमारे तासाभरानंतर रात्री साडेआठच्या सुमारास जेव्हा फोन पुन्हा सुरू झाला, तेव्हा मोबाईलमधील सर्वच्या सर्व ॲप्लिकेशन्स गायब झाले होते. निखत यांनी तांत्रिक बिघाड समजून पुन्हा सर्व आवश्यक ॲप्स डाउनलोड केले.
दुसऱ्या दिवशी निखत यांच्या बहिणीने रिचार्जसाठी पैसे मागितले. त्यामुळे निखत यांनी बँक खात्याचा बॅलन्स तपासला. त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या डीसीबी (DCB) बँक खात्यातून ८८ हजार रुपये परस्पर गायब झाले होते.
त्यांनी तात्काळ 'गुगल पे' (Google Pay) ची हिस्ट्री तपासली असता, ७० हजार रुपये बिकाश पासवान नावाच्या व्यक्तीच्या खात्यात, तर १८ हजार रुपये त्यांच्या पतीच्या खात्यात ट्रान्सफर झाल्याचे दिसले. तसेच ४० हजार रुपयांचे आणखी एक ट्रान्सजेक्शन रिजेक्ट (रद्द) झाल्याचेही समोर आले.
आपल्या खात्यातून पतीच्या खात्यात १८ हजार रुपये जमा झाल्याचे दिसताच निखत यांनी पती अब्दुल खालीद शेख यांच्या ॲक्सिस (Axis) बँकेच्या खात्याची माहिती तपासली. मात्र, सायबर चोरांनी तिथूनही हातसफाई केली होती. पतीच्या खात्यातून ६४ हजार रुपये भामट्यांनी आधीच लांबवले होते. यामधील ५० हजार रुपये सत्यम मिश्रा आणि १४ हजार रुपये शेख रुखसार इम्तियाज यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले होते. सुदैवाने, पतीच्या खात्यावरील इतर दोन मोठे व्यवहार रद्द झाले होते, अन्यथा फसवणुकीचा आकडा आणखी मोठा असता.
मोबाईल हॅक करून दोघांच्या खात्यातून एकूण १ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेख दाम्पत्याने तातडीने '१९३०' या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार नोंदवली. त्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सायबर सेलच्या मदतीने बँक खात्यांचे डिटेल्स आणि आयपी (IP) ॲड्रेसचा तपास करत आहेत.
अनोळखी लिंक्स टाळा: मोबाईलवर येणाऱ्या कोणत्याही अनधिकृत किंवा संशयास्पद अपडेट लिंक्सवर क्लिक करू नका.
अँटीव्हायरसचा वापर: स्मार्टफोनमध्ये अधिकृत अँटीव्हायरस वापरा आणि ॲप्स नेहमी 'गुगल प्ले स्टोअर'वरूनच डाउनलोड करा.
अचानक फोन बंद पडल्यास: जर फोन अचानक रिबूट झाला आणि ॲप्स गायब झाले, तर तात्काळ सिम कार्ड काढून दुसऱ्या फोनवरून आपले बँक खाते ब्लॉक करा.
त्वरित तक्रार: सायबर फसवणूक झाल्यास पहिल्या 'गोल्डन अवर'मध्ये (पिटाळलेल्या वेळेत) 1930 वर कॉल करा, ज्यामुळे पैसे होल्ड होण्याची शक्यता वाढते.