

आजच्या डिजिटल युगात बहुतांश आर्थिक व्यवहार मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि UPIच्या माध्यमातून होत आहेत. व्यवहार सुलभ आणि जलद झाले असले, तरी सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे तुमचे बँक खाते सुरक्षित आहे का, याची वेळोवेळी खात्री करून घेणे अत्यावश्यक ठरते.
सायबर तज्ज्ञांच्या मते, सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये कोणते अँप्स इन्स्टॉल आहेत, याची तपासणी करावी. अनेकदा हॅकर्स बनावट किंवा संशयास्पद अँप्स्सच्या माध्यमातून मोबाईलमधील माहिती चोरतात. त्यामुळे ओळखीचे नसलेले किंवा वापरात नसलेले अँप्स् तात्काळ हटवावेत. तसेच मोबाईलच्या सिक्युरिटी सेटिंग्जमध्ये जाऊन ‘Unknown Sources’ किंवा ‘Install from Unknown Apps’ हा पर्याय सुरू आहे का, हे तपासावे. हा पर्याय सुरू असल्यास कोणतेही अनधिकृतअँप् फोनमध्ये इन्स्टॉल होऊ शकते.
याशिवाय फोनमधील Accessibility, Screen Sharing किंवा Device Control यांसारख्या परवानग्या कोणत्या अँप्सना दिल्या आहेत, हेही पाहणे गरजेचे आहे. कारण अशा परवानग्यांच्या मदतीने हॅकर्स तुमच्या मोबाईलवर नियंत्रण मिळवू शकतात. बँकिंग अँप्ससाठी App Lock, Fingerprint किंवा Face Lock सारखी अतिरिक्त सुरक्षा ठेवणे अधिक सुरक्षित ठरते.
तुमच्या खात्यातील व्यवहारांवर सतत लक्ष ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. SMS Alerts आणि ई-मेल नोटिफिकेशन सुरू ठेवल्यास कोणताही अनधिकृत व्यवहार झाल्यास तात्काळ माहिती मिळते. OTP, CVV, ATM PIN किंवा नेटबँकिंग पासवर्ड कोणाशीही शेअर करू नये. बँक किंवा RBI कधीही अशी माहिती फोनवर मागत नाहीत, हे लक्षात ठेवावे.
जर खात्यातून संशयास्पद व्यवहार झाल्याचा संशय आला, तर वेळ न दवडता संबंधित बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून खाते किंवा कार्ड तात्पुरते ब्लॉक करावे. तसेच राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 वर तक्रार नोंदवावी किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार दाखल करावी.
डिजिटल व्यवहार करताना थोडीशी निष्काळजीपणाही मोठ्या आर्थिक नुकसानीचे कारण ठरू शकते. त्यामुळे जागरूकता, सतर्कता आणि योग्य वेळी केलेली कृती यामुळेच तुमचे बँक खाते सुरक्षित राहू शकते.